सारथीचा पथदर्शी प्रकल्प औरंगाबादेत राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:05 AM2021-06-25T04:05:54+5:302021-06-25T04:05:54+5:30
रोजगाराच्या नवीन वाटा : मराठा समाजातील युवक-युवतींसाठी प्रशिक्षण उपक्रम औरंगाबाद : औद्योगिक विकासाचे महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून औरंगाबाद परिचित आहे. ...
रोजगाराच्या नवीन वाटा : मराठा समाजातील युवक-युवतींसाठी प्रशिक्षण उपक्रम
औरंगाबाद : औद्योगिक विकासाचे महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून औरंगाबाद परिचित आहे. उद्योग क्षेत्राला उपयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी राबविल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेमार्फत (सारथी) औरंगाबादेत मराठा समाजातील युवक-युवतींसाठी प्रशिक्षणाचा पायलट प्रोजेक्ट (पथदर्शी प्रकल्प) राबविण्याचे नियोजन असल्याचे संचालक उमाकांत दांगट यांनी गुरुवारी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सारथीच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत दांगट बोलत होते. यावेळी सारथी संस्थेचे संचालक मधुकर कोकाटे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, कौशल्य विकासचे बी. एन. सूर्यवंशी, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, रमण आजगावकर, प्रसाद कोकीळ, राहुल मोगले, अर्जुन गायकवाड उपस्थित होते.
दांगट म्हणले, सारथी संस्था बदलत्या काळाच्या गरजेप्रमाणे मराठा समाजाच्या तरुण-तरुणींसाठी औद्योगिक क्षेत्रातील रोजगाराच्या वाढत्या संधीनुसार प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार आहे. उद्योजक संघटनांनी लहान, मध्यम आणि मोठ्या उद्योगांच्या मनुष्यबळ आवश्यकता, त्यासाठीचे प्रशिक्षण, उपक्रम राबविण्यासाठी लागणारे प्रशासकीय आणि आर्थिक साहाय्य या बाबींसह पाच वर्षांचा प्रशिक्षण कृती आराखडा तयार करून सादर करावा. सदर प्रस्तावावर संस्थेचे संचालक मंडळ निर्णय घेईल. कोकाटे यांनी पारंपरिक ते अद्ययावत रोजगाराला पूरक असलेल्या विविध प्रशिक्षणाची नवतरुणांना गरज आहे. त्यादृष्टीने सारथीच्या माध्यमातून रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबवायचे आहेत, असे सांगितले.
आयटीआयला सारथीने साहाय्य करावे
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी, कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार उपक्रम राबविण्यात येत आहेत. सारथीच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात सदरील प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतील. त्याचप्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) श्रेणी सुधारणा करणे आवश्यक असून, या संस्थेतील उपयुक्त, चांगल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाला सारथीने साहाय्य करावे, असे नमूद केले.