मायबाप सरकार, ५० रुपयांत घरी कसे जाणार? जनआरोग्य योजनेत प्रवासासाठी तुटपुंजी रक्कम
By संतोष हिरेमठ | Published: September 25, 2023 06:37 PM2023-09-25T18:37:32+5:302023-09-25T18:38:30+5:30
रुग्णालयातून सुटी होताना रुग्णाच्या हातात ५० रुपये देऊन फोटो काढून घेतला जातो
छत्रपती संभाजीनगर : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत उपचार घेणाऱ्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर प्रवासापोटी रक्कम दिली जाते. ही रक्कम वाचून तुम्ही थक्क व्हाल. जिल्ह्यातील रुग्णांसाठी ही रक्कम आहे ५० रुपये आणि जिल्ह्याबाहेरील रुग्णांसाठी १०० रुपये आहे. इतक्या रकमेत फक्त रुग्णालयातून बसस्थानक आणि रेल्वे स्थानकच गाठता येते. पुढचा प्रवास कसा करणार, असा प्रश्न रुग्णांना भेडसावतो.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमुळे जिल्ह्यासह राज्यभरातील ३६ जिल्ह्यांतील गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांना उपचार घेणे सोयीचे झाले आहे. या योजनेमुळे उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव करण्याची वेळ टळते. या योजनेत पूर्वी १.५० लाखांपर्यंत विमा संरक्षण होते. आता या योजनेत ५ लाखांपर्यंत मोफत उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सगळ्यामुळे गोरगरीब, सर्वसामान्य रुग्ण दिलासा व्यक्त करत आहेत. परंतु, उपचारानंतर सुटी होताना प्रवासापोटी दिली जाणारी रक्कम पाहून रुग्णांना काहीसा धक्काच बसतो.
किती जणांना प्रवासासाठी दिली रक्कम?
या योजनेत प्रवासासाठी ५० ते १०० रुपये देण्यात येतात. जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट (आतापर्यंत) १४ हजार ४०७ लाभार्थ्यांनी या योजनेत मोफत उपचारांचा लाभ घेतला. यासाठी ७४ कोटी ८० लाख ४२ हजार ६०५ रुपयांचे उपचार मंजूर करण्यात आले.
घाटीतून मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानकाचे भाडे किती?
घाटी रुग्णालयातून मध्यवर्ती बसस्थानकाला जाण्यासाठी ५० रुपये आणि रेल्वे स्थानकाचे भाडे १०० रुपये सांगण्यात आले. घाटीत मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यांतून रुग्ण येतात.
पैठण, खुलताबादचे एसटी भाडे किती?
मध्यवर्ती बसस्थानकातून पैठणसाठी ८० रुपये आणि खुलताबादसाठी ४५ रुपये भाडे आहे.
रेल्वेचे भाडे किती?
जनरल तिकीट घेतले तर जालन्यासाठी एक्स्प्रेस रेल्वेचे ४० रुपये, सुपरफास्ट रेल्वेचे ५५ रुपये भाडे आहे. परभणीसाठी एक्स्प्रेसचे ७५ रुपये आणि सुपरफास्ट एक्स्प्रेसचे ९० रुपये भाडे आहे, तर नांदेडसाठी एक्स्प्रेसचे भाडे ९० रुपये आणि सुपरफास्ट एक्स्प्रेसचे भाडे १०५ रुपये आहे.
काय म्हणाले अधिकारी?
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, योजनेत एसटी आणि रेल्वेच्या जनरल तिकिटानुसार रक्कम देण्याचे नमूद आहे. त्यानुसार ५० रुपये आणि १०० रुपये दिले जातात.