'सरकारी बाबू' सुटले, भूखंड हस्तांतरणासाठी ८ हजार रुपये लाच मागणारा एजंट अडकला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 12:38 PM2024-10-18T12:38:27+5:302024-10-18T12:38:55+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील एजंटच्या रॅकेटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा धक्का
छत्रपती संभाजीनगर : भूखंड हस्तांतरित करून त्याची निबंधक कार्यालय व सिडको नोंद करून देण्यासाठी ८ हजारांच्या लाचेची मागणी करणारा एजंट मुनीर गणी नाईक (६५, रा. नाहेद नगर, हत्तीसिंगपुरा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. गुरुवारी सकाळी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. मात्र, 'सरकारी बाबू' सुटले अन् एजंट अडकला, अशी प्रतिक्रिया महसूल व सिडको खात्यात गुरुवारी उमटली.
आईच्या मृत्यूनंतर आईच्या नावावर असलेला सिडको हद्दीतील भूखंड तक्रारदाराला स्वत:च्या नावावर करायचा होता. तक्रारदाराने त्यासाठी रीतसर सिडको कार्यालयात अर्ज केला. नियमानुसार मुद्रांक नोंदणी शुल्क व अन्य सर्व प्रक्रिया पार पाडून १ लाख २८ हजार २४२ रुपयांच्या शुल्काचा भरणा देखील केला. तक्रारदाराच्या नावाने भाडेपट्ट्याची निबंधक कार्यालयात नोंदणी करण्यासाठी मात्र त्यांना एजंट मुनीरने गाठले. पैसे भरल्याशिवाय काम होणार नाही, असे सांगून १० हजारांची मागणी केली. तक्रारदाराने याची थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे १५ ऑक्टोबर रोजी तक्रार केली. आटोळे यांच्या आदेशावरून उपअधीक्षक दिलीप साबळे, निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांनी तक्रारीची खातरजमा सुरू केली.
बुधवारी गैरहजर, गुरुवारी अडकला
मुनीर सिडको व निबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावे लाच मागत असल्याचे निष्पन्न होताच निरीक्षक शांतीलाल चव्हाण, अंमलदार भीमराज जिवडे, रवींद्र काळे यांनी बुधवारी सापळा रचला. तडजोडीअंती मुनीरने ८ हजार रुपये सांगितले. बुधवारी मुनीर आलाच नाही. गुरुवारी पुन्हा सापळा रचण्यात आला. निबंध कार्यालयाच्या आवारातील एटीएमसमोर त्याला ८ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
सिडको, निबंध कार्यालयावर संतप्त
या सापळ्यात एजंट मुनीर अडकला असला तरी तो कोणासाठी काम करतो, पैसे घेऊन आत कोणाकडून काम करवून घेतो, याचा आता एसीबी तपास करणार आहे. तक्रारदाराला सिडको व निबंधक कार्यालयात नाहक चकरा मारण्यास भाग पाडले. रीतसर प्रक्रिया पार पाडूनही मंजुरी दिली नाही. सिडको व निबंधक कार्यालयात सरकारी बाबूंचा आशीर्वाद असलेले शेकडो एजंट तक्रारदारांना भेटून पैशांसाठी गळ घालतात. त्यांच्यावर कोणाचाही वचक राहिला नसल्याने संतप्त तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.