सिरसगाव ग्रामपंचायतीत सरपंचपदाचा पेच कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:05 AM2021-02-05T04:05:41+5:302021-02-05T04:05:41+5:30
बाबासाहेब धुमाळ वैजापुर : सरपंचपदाच्या मागास प्रवर्गाच्या (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती) आरक्षणात चूक झाल्याने वैजापूर व पैठण तालुक्यातील ...
बाबासाहेब धुमाळ
वैजापुर : सरपंचपदाच्या मागास प्रवर्गाच्या (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती) आरक्षणात चूक झाल्याने वैजापूर व पैठण तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत २९ जानेवारीला स्थगित करण्यात आले. मात्र, वैजापूर तालुक्यातील सिरसगाव ग्रामपंचायत येथील सरपंचपद हे राखीव असल्याने त्या प्रवर्गातील उमेदवार निवडून न आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनुसूचित जाती-जमातीतील महिलेसाठी राखीव असलेल्या सिरसगाव येथे त्या प्रवर्गातील महिला सदस्य निवडून न आल्याने या ठिकाणी सरपंचपदाचा पेच निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायत सरपंच आरक्षणाच्या अधिनियमातील तरतुदीनुसार लोकसंख्येच्या आधारे अनुसूचित जमातीतील प्रवर्गासाठी तालुक्यातील १४ ग्रामपंचायती निश्चित केल्या होत्या. त्यातून चिठ्ठी काढून पन्नास टक्के अर्थात ७ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या होत्या. त्यात सिरसगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी निघाले होते. या गावात वॉर्ड क्रमांक दोनमधील एक जागा अनुसूचित जमातीतील खुल्या प्रवर्गासाठी राखीव झालेली होती. सरपंच आरक्षण सोडतीवेळी गावातील नागरिकांनी महिलेसाठी प्रभाग राखीव नसल्याचे सांगत यावर आक्षेप घेतला होता. अनुसूचित जातीतील खुल्या प्रवर्गातून महिला किंवा पुरुष दोघेही निवडणूक लढवू शकतात, असे प्रशासनाने सांगून त्यांचा आक्षेप खोडून काढला होता. दरम्यान, निवडणुकीत प्रभाग दोनमधील अनुसूचित जमातीसाठी राखीव जागेवर सावकार शिरसाठ हे विजयी झालेले आहेत. त्यांच्याविरोधात रिंगणात असलेल्या चारही महिलांना हार मानावी लागली. अनुसूचित जातीतील खुल्या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर महिला निवडून आली असती तर ती सरपंच होऊ शकली असती. मात्र, सरपंचपदासाठी राखीव असलेल्या प्रवर्गातील पुरुष उमेदवार निवडून आलेला आहे. त्यामुळे सरपंच निवडीचे कसे होणार. हा प्रश्न उपस्थित झालेला आहे.