उचापतीमुळे सरपंचपती अडकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 11:44 PM2018-12-04T23:44:48+5:302018-12-04T23:45:25+5:30
खरेदी केलेल्या जमिनीची नोंद ८ अ चा उतारा घेण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सरपंचपतीच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. भाऊसाहेब तुकाराम गोजरे (३६, रा. वडजी, ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे.
औरंगाबाद : खरेदी केलेल्या जमिनीची नोंद ८ अ चा उतारा घेण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सरपंचपतीच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. भाऊसाहेब तुकाराम गोजरे (३६, रा. वडजी, ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार याने वडजी येथे जमीन खरेदी केली होती. या जमिनीची नोंद नमुना नं. ८ अ च्या उताºयाला घेण्यासाठी तक्रारदाराने ग्रामसेवकाकडे विनंती केली; परंतु ग्रामसेवक यांनी सरपंच यांना विचारल्यानंतर नोंद होईल, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने सरपंचपती भाऊसाहेब तुकाराम गोजरे याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी भाऊसाहेब गोजरे याने नोंद घेण्यासाठी ५ हजार रुपये लागतील, असे सांगितले. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यासाठी दि. २१ नोव्हेंबर रोजी पंचासमक्ष तक्रारदाराला पाठविण्यात आले. वडजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात भाऊसाहेब गोजरे याने नोंद करण्याचे ग्रामसेवकाला सांगतो त्यासाठी ५ हजार रुपये लागतील, असे म्हणून लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
लाच स्वीकारण्याची मागणी केली
त्यानंतर कार्यालयातच सापळा रचण्यात आला; परंतु गोजरे याला याचा संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही; परंतु गोजरे याने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्या विरुद्ध मंगळवारी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक शंकर जिरगे, पोलीस उपाधीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक गणेश धोक्रट, पोहेका. विजय बांम्हदे, गणेश पंडुरे, पोलीस नाईक भीमराज जिवडे, शिपाई सुनील पाटील, चालक संदीप चिंचोले यांनी पार पाडली.