आज सरपंचपदाचा फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:07 AM2021-02-05T04:07:57+5:302021-02-05T04:07:57+5:30
सोयगाव : तालुक्यात ४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. २९) सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात येणार असून, यातील सहा ग्रामपंचायती दुसऱ्या टप्प्यातील ...
सोयगाव : तालुक्यात ४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. २९) सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात येणार असून, यातील सहा ग्रामपंचायती दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी पात्र आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पत्रावरून याआधी काढलेल्या दहा आरक्षित ग्रामपंचायतींचे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षण कायम करण्यात आल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
सोयगाव तालुक्यात निवडणुकीपूर्वी काढण्यात आलेल्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी जंगलीकोठा, वडगाव(ती), मोहळाई, कंकराळा, देव्हारी आणि तिडका या सहा ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण कायम करण्यात आले आहे. यातील कंकराळा ग्रामपंचायतीची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात आहे. अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी कवली (महिला), पहुरी (महिला) आणि तितूर, डाभा (सर्वसाधारण) या प्रवर्गाचे आरक्षण कायम करण्यात आले. त्यामुळे दहा ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत कायम झाल्याने शुक्रवारी ३६ ग्रामपंचायतींसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग या दोन प्रवर्गासाठी सरपंच आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यासाठी या प्रवर्गातही महिलांसाठी पन्नास टक्के ग्रामपंचायती आरक्षित असल्याने ३६ ग्रामपंचायतींमधून पुन्हा पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार असल्याने आरक्षणाची खरी बाजी ३१ ग्रामपंचायतींसाठीच होणार आहे. आरक्षण काढण्यात येणाऱ्या या दोन्ही प्रवर्गात आमखेडा, जरंडी, हनुमंतखेडा, घोसला, गोंदेगाव, वरठाण, सावळदबारा, बनोटी, निंबायती, पळाशी, फर्दापूर, नांदातांडा आणि गलवाडा या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
---- बचत भवनाच्या सभागृहात सोडत ---
सोयगाव पंचायत समितीच्या बचत भुवन सभागृहात शुक्रवारी (दि.२९) सरपंचपदासाठी आरक्षण सोडत तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे. या सोडतीच्या अनुषंगाने तालुका प्रशासनाने नवनियुक्त सदस्यांना पूर्वकल्पना दिली असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले आहे.