साताजन्माच्या गाठी २४ तासातच सुटल्या; लग्नाच्या पहिल्याच दिवशी नववधू दागिन्यांसह फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 05:29 PM2020-10-21T17:29:15+5:302020-10-21T17:29:51+5:30
मुलाच्या आईकडून वधूच्या बहिण आणि मेहुण्याने ५० हजारही घेतले
पैठण : लग्नाच्या पहिल्याच दिवशी नववधू दागिन्यांसह फरार झाल्याची घटना पैठण येथे नुकतीच घडली.लग्न जमण्यास अडथळा येत असल्याने कृष्णा वनसारे यांचे त्यांच्या आईने दलालामार्फत लग्न जुळवले. मुलीला हुंडाही देण्यात आला. मात्र, लग्नाच्या पहिल्याच रात्री हळदीच्या अंगासह नववधू लग्नाच्या दागिन्यांसह फरार झाली. विशेष म्हणजे फरार झालेल्या नववधू उषा पवार हिला फोनवरून संपर्क साधला असता तिने मुलाच्या आईस दमदाटी केली.
नववधू घरातून फरार झाल्याची तक्रार कृष्णा वनसारे यांनी पैठण ठाण्यात दिली. मोलमजुरी करून कृष्णा कारभारी वनसारे (२४) आईसह पैठणमध्ये लक्ष्मीनगर भागात राहताे. कृष्णाच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. कृष्णाची आई उपवर मुलीच्या शोधात होती. अखेर त्यांना नुर मोहमद मेहरन शेख याने कृष्णासाठी मुलगी बघितल्याचे सांगितले व १६ रोजी पैठण येथील नाथमंदिर परिसरात कृष्णा व त्याच्या आईस ती मुलगी दाखविली. मुलीला लगेच होकार देण्यात आला. १७ रोजी दुपारी ३ वाजता उषा पवार व कृष्णा वनसारे यांचे कृष्णाच्या घरात लग्न लावण्यात आले. त्याच दिवशी रात्री तीन ते पाच वाजेच्या दरम्यान घरातील सदस्य गाढ झोपेत असताना नववधू उषा पवारने पलायन केले.
कायमस्वरूपी अप्रुव्हलची मागणी केली असता संस्थाचालकांनी जिवे मारण्याची धमकी दिली.https://t.co/X41nWhHgR2
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) October 21, 2020
मुलगी दाखवण्यासाठी दलालाने घेतले पैसे
पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील नुर मोहंमद शेख याने मुलगी दाखवण्यासाठी ५ हजार रुपये घेतले. विशेष म्हणजे कृष्णाच्या आईकडे वधूची बहीण व मेहुण्याने दोन लाख रुपये मागितले होते. मात्र, कृष्णाच्या आईने एवढे पैसे नाहीत, असे सांंगितल्यानंतर शेवटी ५० हजार रुपये हुंडा घेऊन लग्नास होकार देण्यात आला.