सातारा येथील दोन कि.मी. रस्त्यावर १६० खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:51 PM2018-03-23T13:51:56+5:302018-03-23T13:54:09+5:30
सातारा पोलीस ठाणे ते गावात जाणार्या रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्ता उखडल्याने दोन ते अडीच कि.मी. रस्त्यावर तब्बल १६० ठिकाणी खड्डे पडले आहेत.
औरंगाबाद : सातारा पोलीस ठाणे ते गावात जाणार्या रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्ता उखडल्याने दोन ते अडीच कि.मी. रस्त्यावर तब्बल १६० ठिकाणी खड्डे पडले आहेत. पादचार्यांसह वाहनधारकांनाही या रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
सातारा परिसरातील पोलीस ठाणे ते मूळ गाव या रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. मागील १५-२० वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. नवीन वसाहत व मूळ गावाला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. याच रस्त्यावर पोलीस ठाणे आहे. गावातच प्रसिद्ध खंडोबा मंदिर, मनपा वॉर्ड कार्यालय आहे. एसआरपी केंद्राकडे जाण्यासाठीही हाच मुख्य रस्ता आहे. जास्त रहदरी असल्याने रस्ता अल्पावधीतच खराब झाला. दरम्यानच्या काळात स्थानिक प्रशासनाने मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजविले; पण दोन-चार महिन्यांतच तो खराब झाला. सद्य:स्थितीत रस्ता अनेक ठिकाणी उखडला असल्याने रस्त्याची अवस्था फारच वाईट झाली आहे. रस्त्यावर खडी पसरून जागजागी खड्डे पडले आहेत. तसेच रस्ता उखडला गेल्याने रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजचे चेम्बरही उघडे पडले आहेत. या दोन ते अडीच कि.मी. रस्त्यावर छोटे-मोठे मिळून तब्बल १६० खड्डे पडले आहेत. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी राहत असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावरून नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांची सतत ये-जा असते. सायंकाळच्या वेळी तर रस्ता पूर्ण जाम होतो. खड्डे व खडीमुळे वाहनधारकांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे.
लवकर रस्ता करावा
रस्त्याची वाईट अवस्था असून, रस्ता उखडला आहे. हा मुख्य रस्ता असल्याने पादचार्यांसह वाहनधारकांनाही त्रास होत आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन मनपाने रस्ता लवकर करावा; अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील, असे सोमीनाथ शिराणे यांनी सांगितले.
मुलांना मणक्यांचा त्रास
मागणी करूनही रस्ता दुरुस्त केला जात नाही. विद्यार्थ्यांना खड्ड्यांतून ये-जा करावी लागत असल्याने लहान वयातच मणक्यांचा त्रास होत आहे, असे राहुल शिंदे यांनी सांगितले.