सातारा-देवळाई न.प.ची निवडणूक वॉर्डनिहायच
By Admin | Published: January 2, 2015 12:32 AM2015-01-02T00:32:32+5:302015-01-02T00:50:17+5:30
औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेच्या निवडणुका वॉर्डनिहाय होणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.
औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेच्या निवडणुका वॉर्डनिहाय होणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. निवडणुका वॉर्ड पद्धतीने घेतल्या जाणार असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने याआधी जाहीर केलेला प्रभाग रचनेचा कार्यक्रम रद्द केला आहे.
राज्य सरकारने २८ आॅगस्ट रोजी सातारा आणि देवळाई या दोन गावांसाठी संयुक्त नगर परिषद स्थापन केली आहे. या नगर परिषदेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठी आयोगाने प्रभाग रचना तयार करून त्यानुसार निवडणूक घेण्याचे काम हाती घेतले होते. शिवाय राज्यातील कुळगाव-बदलापूर, सातारा-देवळाई आणि वाडी या तीन नगर परिषदांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रमही घोषित केला होता. मात्र, आता राज्य सरकारने राज्यातील नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीऐवजी एकसदस्यीय पद्धतीचा अवलंब करून घेण्याचे ठरविले आहे. या निर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगाने आधी जाहीर केलेला प्रभाग रचनेचा कार्यक्रम रद्द केला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव ध. मा. कानेड यांनी बुधवारी याविषयीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.