सातारा न.प.चे कामकाज सुरू
By Admin | Published: September 7, 2014 12:37 AM2014-09-07T00:37:02+5:302014-09-07T00:42:23+5:30
औरंगाबाद : आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर आजपासून सातारा-देवळाई नगर परिषदेचे कामकाज सुरू झाले.
औरंगाबाद : आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर आजपासून सातारा-देवळाई नगर परिषदेचे कामकाज सुरू झाले. अधिसूचनेची प्रत प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार तथा प्रशासक विजय राऊत यांनी आज ग्रामसेवकांकडून पदभार स्वीकारला. याबरोबरच सातारा आणि देवळाई या दोन्ही ग्रामपंचायती बरखास्त झाल्या आहेत.
सातारा आणि देवळाई गावांची झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेऊन राज्य सरकारने येथे नगर परिषद स्थापन केली आहे. नगरविकास विभागाने दोन्ही गावांसाठी एक संयुक्त नगर परिषद स्थापन केल्याची अधिसूचना २८ आॅगस्ट रोजीच जारी केली. मात्र, गेली आठ दिवस जिल्हा प्रशासनाला अधिसूचनेची अधिकृत प्रत प्राप्त झाली नव्हती. राज्य सरकारने नवीन नगर परिषदेवर प्रशासक म्हणून औरंगाबाद येथील तहसीलदारांची नियुक्ती केली आहे. हा आदेशही अधिसूचनेतच नमूद होता; पण अधिसूचनेची प्रत नसल्यामुळे प्रशासकांनी पदभार स्वीकारला नव्हता. शुक्रवारी अधिसूचनेची प्रत प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार विजय राऊत यांनी आज नगर परिषदेचे प्रशासक म्हणून पदभार घेतला. दुपारी १ वाजता त्यांनी सातारा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाऊन ग्रामसेवक बी. टी. साळवे यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. त्यानंतर देवळाई ग्रामपंचायत कार्यालयात जाऊनही त्यांनी तेथील ग्रामसेवक धनेधर यांच्याकडून पदभार घेतला. दोन्ही ग्रामसेवकांकडून ग्रामपंचायतींची कागदपत्रे आणि दप्तर ताब्यात घेण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.
जमाखर्चाचा हिशोब सुरू
सातारा आणि देवळाई येथील ग्रामपंचायती बरखास्त होऊन तिथे आजपासून नगर परिषद अस्तित्वात आली. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या ग्रामसेवकांकडून दप्तर प्रशासकांच्या ताब्यात देण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. यात ग्रामसेवकांकडून मालमत्तांची माहिती, जमाखर्चाचा हिशोब, कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड तसेच जमिनीच्या नोंदी आदींचा समावेश आहे. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत नवीन नगर परिषदेकडे किती जमा रक्कम आहे, याचा हिशोब मिळाला नसल्याचे प्रशासक विजय राऊत यांनी सांगितले.