सातारा न.प. आक्षेपांवर २७ जून रोजी सुनावणी
By Admin | Published: June 13, 2014 12:55 AM2014-06-13T00:55:58+5:302014-06-13T01:11:50+5:30
औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषद स्थापनेची रखडलेली कार्यवाही पुन्हा सुरू झाली आहे.
औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषद स्थापनेची रखडलेली कार्यवाही पुन्हा सुरू झाली आहे. नगर परिषद स्थापनेबाबत आलेले आक्षेप आणि सूचनांवर जिल्हा प्रशासनाने २७ जून रोजी सुनावणी ठेवली आहे. सुनावणीनंतर लगेचच राज्य सरकारला अहवाल सादर होऊन नगरपालिका स्थापनेची अधिसूचना जारी होणार आहे.
औरंगाबाद शहरालगत सातारा आणि देवळाई गावांच्या हद्दीत गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने विकास होत आहे. दोन्ही गावांच्या परिसरात मोठमोठ्या इमारती उभ्या राहत असून, येथील लोकसंख्याही ५० हजारांच्या पुढे गेली आहे. या भागांचा सुनियोजित विकास व्हावा यासाठी दोन्ही गावांची मिळून संयुक्त नगर परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने गेल्यावर्षी राज्य सरकारकडे पाठविला होता. त्यावर राज्याच्या नगरविकास विभागाने १३ फेबु्रवारी रोजी सातारा- देवळाई नगर परिषदेची उद्घोषणा जारी केली. याद्वारे सरकारने नगर परिषद स्थापनेचा इरादा जाहीर करून स्थानिक नागरिकांकडून याविषयीच्या सूचना आणि आक्षेप मागविले. १५ फेबु्रवारी ते १५ मार्च यादरम्यान जिल्हा प्रशासनाला १५ सूचना आणि आक्षेप प्राप्त झाले. त्यानंतर लगेचच सुनावणी होणे अपेक्षित होते; परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया रखडली. लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर याविषयी कार्यवाही सुरू झाली. त्यात पुन्हा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही कार्यवाही थांबविण्यात आली.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता २४ जून रोजी संपणार आहे. २७ जून रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुनावणी झाल्यावर दोन-तीन दिवसांत अहवाल सरकारला सादर केला जाईल. हा अहवाल सादर झाल्यानंतर सरकारकडून अधिसूचना जारी होऊन सातारा- देवळाई संयुक्त नगरपालिका अस्तित्वात येणार आहे.
१५ पैकी ३ आक्षेप मागे
नगरपालिका स्थापनेसंदर्भात स्थानिक नागरिकांकडून १५ आक्षेप दाखल झाले होते. मात्र, त्यातील ३ आक्षेप नंतर मागे घेण्यात आले. आता १२ आक्षेप आहेत. त्यातील बहुतांश आक्षेप सूचना करणारे आहेत.
सातारा आणि देवळाईलगतचे आणखी काही गट नवीन नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करावेत, अशी मागणी त्यात करण्यात आलेली आहे. या सर्व सूचना आणि आक्षेपांवर सुनावणी होणार आहे.
कशी असेल नवीन नगर परिषद
गावेलोकसंख्याक्षेत्रफळमालमत्ता
सातारा३९,९६०२,७९३ हेक्टर१८,३४८
देवळाई १०,६१०४६४ हेक्टर७,६१५
एकूण५०,५७०३,२५८ हेक्टर२५,९६३