सातारा- देवळाईत आज मतदान
By Admin | Published: April 17, 2016 01:27 AM2016-04-17T01:27:05+5:302016-04-17T01:36:25+5:30
औरंगाबाद : सातारा- देवळाई परिसरातील दोन वॉर्डांमध्ये आज मतदान घेण्यात येत आहे. दोन नगरसेवक निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
औरंगाबाद : सातारा- देवळाई परिसरातील दोन वॉर्डांमध्ये आज मतदान घेण्यात येत आहे. दोन नगरसेवक निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भौगोलिकदृष्ट्या दोन्ही वॉर्ड खूप मोठे असल्याने उमेदवारांना बराच घाम गाळावा लागला. पाऱ्याने चाळिशी पार केल्याने किती मतदार मतदान केंद्रापर्यंत येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रविवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार असून, वॉर्ड क्रमांक ११४ मध्ये चौरंगी लढत आहे. वॉर्ड क्रमांक ११५ मध्ये तिरंगी लढत होणार आहे. दोन्ही वॉर्डात ११ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. वॉर्ड क्रमांक ११४ मध्ये शिवसेना, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अशी लढत होणार असल्याने मतदारांचा कौल कोणत्या बाजूने जाईल यावर वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. चार अपक्षही कंबर कसून निवडणूक मैदानात उतरले आहेत. वॉर्ड क्रमांक ११५ मध्ये शिवसेना, काँग्रेस, भाजप असा बहुरंगी सामना आहे. या वॉर्डातील महिला उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. या वॉर्डात सुशिक्षित मतदार मोठ्या संख्येने आहेत. रविवारी सुट्टी आहे. पारा चाळिशी पार गेला असल्याने मतदार किती मतदान केंद्रापर्यंत येतात यावर बरीच समीकरणे अवलंबून आहेत.
वॉर्ड क्रमांक ११४ मधील काँग्रेसचे उमेदवार राजूकाका नरवडे, शिवसेनेचे उमेदवार हरिभाऊ हिवाळे, भाजपचे उमेदवार अप्पासाहेब हिवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नामदेव बाजड, चार अपक्ष उमेदवारांनी बरीच मेहनत घेतली आहे. वॉर्ड क्रमांक ११५ सातारा येथील शिवसेनेच्या उमेदवार पल्लवी गायकवाड, काँग्रेसच्या उमेदवार सायली जमादार, भाजपच्या उमेदवार सुरेखा बावस्कर यांनी प्रचारावर चांगलाच भर दिला होता.