औरंगाबादमध्ये आहे सातवाहनकालीन जाते; एकाच वेळी दोन महिला दळत होत्या दळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 07:29 PM2018-08-04T19:29:59+5:302018-08-04T19:36:59+5:30

सर्वांनी उभ्या दांड्याचे जाते पाहिले आहे; पण शहरात आडव्या दांडीचे दुर्मिळ जाते जतन करून ठेवण्यात आले आहे, तेही सातवाहनकालीन, म्हणजे सुमारे २ हजार वर्षांपूर्वीचे.

Satavahan days Stone flour mill is in Aurangabad; At the same time, two women were needed for grinding | औरंगाबादमध्ये आहे सातवाहनकालीन जाते; एकाच वेळी दोन महिला दळत होत्या दळण

औरंगाबादमध्ये आहे सातवाहनकालीन जाते; एकाच वेळी दोन महिला दळत होत्या दळण

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात आडव्या दांडीचे दुर्मिळ जाते जतन करून ठेवण्यात आले आहेया जात्याला आडवी दांडी, एकाच वेळी दोन महिला दळत होत्या दळण

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : पूर्वी घरोघरी महिला जात्यावरच दळण दळत असत; मात्र काळाच्या ओघात जाते मागे पडले. आता फक्त लग्नाच्या विधीपुरतेच जात्याचे महत्त्व मर्यादित राहिले आहे. सर्वांनी उभ्या दांड्याचे जाते पाहिले आहे; पण शहरात आडव्या दांडीचे दुर्मिळ जाते जतन करून ठेवण्यात आले आहे, तेही सातवाहनकालीन, म्हणजे सुमारे २ हजार वर्षांपूर्वीचे. ते दगडी जाते एवढे जड आहे की फिरवण्यासाठी दोन महिला लागत.   

‘कोंबड्याची बांग.. आली कानावर बाई... ये गं दळण दळाया, सई बाई गं बाई....सासराच्या जात्यात... जीव अडकतो लई, गरागरा फिरताना.. हात थांबतच न्हाई’, अशा ओव्या म्हणत सासुरवाशिणी पहाटे पायलीपायलीने दळण दळत असत. भक्तीची आस आणि प्रापंचिक दु:खाची न संपणारी वीण यांचे दर्शन पहाटेच्या जात्यावरच्या ओव्यांमधून होत असे. या जात्यांची व ओव्यांची आठवण शहरातील पुराणवस्तू संग्राहक रमेश रुणवाल यांनी त्यांच्याकडील सातवाहनकालीन जाते दाखविल्याने झाली. टिळकपथ रोडवरील आपल्या दुकानातील माळवदावर त्यांनी हा दुर्मिळ, ऐतिहासिक ठेवा जतन करून ठेवला आहे. जाते तर सर्वांना माहीत आहे. मग, या जात्याचे वैशिष्ट्य काय... असे आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल.

आजही अनेकांच्या घरात दगडी जाते आहे; पण त्यास फिरविण्यासाठी एकच दांडा असतो; मात्र रुणवाल यांच्याकडील जात्याला उभा नव्हे आडवा दांडा आहे. एक नव्हे, तर दोन महिला समोरासमोर बसून या जात्यावर दळण दळत असत. इतिहास संशोधकांच्या मते सातवाहन काळात या जात्याची निर्मिती झाली असावी. तेव्हा जात्याला आडवी दांडी असे. रमेश रुणवाल यांनी सांगितले की, पुराणवस्तूच्या शोधासाठी ते देशभर फिरत असतात.

३६ वर्षांपूर्वी नेवासा येथील त्यांचे मित्र मोहिते यांच्या घरी त्यांना हे आडव्या दांडीचे जाते दिसले. मोहित्यांनी ते जाते रुणवाल यांना दिले. हे जाते सातवाहनकालीन असल्याचा निर्वाळा तेव्हाच इतिहास संशोधक ब्रह्मानंद देशपांडे यांनी दिला होता. रुणवाल यांनी हे जाते नंतर आपल्या पोटच्या मुलासारखे सांभाळले आहे; मात्र आता  जात्याच्या दगडाची झीज झाली आहे. खालच्या पाळूला तडेही गेले आहेत. आता हे जाते जतन करणे अवघड होत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तुसंग्रहालय किंवा सोनेरी महल येथील पुरातनवस्तुसंग्रहालयात हे प्राचीन जाते देण्याचा त्यांचा विचार आहे.

अशी जाती दुर्मिळच 
इतिहास संशोधक डॉ.रा.श्री. मोरवंचीकर हे जात्याचे वैशिष्ट्य सांगताना म्हणाले की, ‘सातवाहनकालीन महाराष्ट्र’ या पुस्तकात मी  सातवाहनकालीन जात्याचा उल्लेख केला आहे. सिंधू संस्कृतीत पाट्यांचा वापर केला जात असे. पाट्यांप्रमाणे सातवाहन घरांत जाती सापडली आहेत. धान्य दळण्यासाठी जात्याचा उपयोग प्रथम याच काळात केला गेला. या जात्याची खालची तळी पातळ व बर्हिगोल असून, वरची तळी उभट गोल आकारात असत. वरच्या तळीस उंचावलेले तोंड असून, या तोंडाच्या गळ्यातून आडवा लाकडी दांडा घालण्याकरिता आरपार छिद्र आहे. वरची तळी खालच्या तळीमध्ये अडकवलेल्या उभ्या लोखंडी खिळ्याभोवती बसविली जाते. दोन महिला परस्परांसमोर बसून आडव्या दांड्याच्या  मदतीने जाते गोलाकार फिरवीत. आजच्या जात्याच्या सुटसुटीतपणापुढे हे जाते थोडेसे अवघड वाटते.

उत्खननात सापडतात...
आडवी दांडी असलेले हे जाते सातवाहनकालीन आहे. कोल्हापूर, शिरपूर, नेवासा, भोकरदन या पट्ट्यात उत्खन्नात अशी जाती सापडली आहेत. ५० वर्षांपूर्वी नेवासा भागात डेक्कन कॉलेजने डॉ. साकलिया यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन केले होते. त्यात आडव्या दांडीचे तीन जाते सापडले होते. काही संग्राहालयांत अशी जाती आपणास बघण्यास मिळतील. 
- साईली पलांडे-दातार, पुरातत्व अभ्यासक 

Web Title: Satavahan days Stone flour mill is in Aurangabad; At the same time, two women were needed for grinding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.