दिवाळीच्या ४ दिवसांत समाधानकारक उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:03 AM2017-10-22T01:03:35+5:302017-10-22T01:03:35+5:30

दिवाळीत रविवार ते बुधवार दरम्यान शहरात समाधानकारक उलाढाल झाली शेवटच्या दिवसात रेडिमेड कपडे, एलईडी टीव्ही, मोबाइल, वाहन खरेदी समाधानकारक राहिली.

 Satisfactory turnover in 4 days of Diwali | दिवाळीच्या ४ दिवसांत समाधानकारक उलाढाल

दिवाळीच्या ४ दिवसांत समाधानकारक उलाढाल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दिवाळीत रविवार ते बुधवार दरम्यान शहरात समाधानकारक उलाढाल झाली. ऐनवेळेवर वस्तू खरेदीचा ट्रेंड आल्याने उलाढालीवर परिणाम दिसून आला. पण शेवटच्या दिवसात रेडिमेड कपडे, एलईडी टीव्ही, मोबाइल, वाहन खरेदी समाधानकारक राहिली. सोने खरेदीत मात्र, अपेक्षित उलाढाल होऊ शकली नाही.
दिवाळी आधीच्या शनिवारपर्यंत शहरात उलाढाल नगण्य होती. यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. कारण अनेकांनी लाखो तर काहींनी कोट्यवधींच्या मालाचा दुकानात स्टॉक करून ठेवला होता. मात्र, रविवारी ग्राहकांची वर्दळ वाढली ते लक्ष्मीपूजनापर्यंत टिकून होती. ऐनवेळेवर खरेदीसाठी शहरवासीयांची झुंबड उडाली होती. रेडिमेड पोशाख खरेदीवरच सर्वांची मदार राहिली. कपडा बाजाराला मात्र, याचा फटका बसला. वाहन बाजार व सराफा बाजारात धनतेरस व पाडव्याला उलाढाल चांगली झाली. इलेक्ट्रॉनिक्स बाजारात एलईडी टीव्ही व मोबाइल खरेदीवर ग्राहकांनी अधिक भर दिला. जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा यांनी सांगितले की, पूर्वी १५ दिवस आधीच दिवाळीची खरेदी सुरू होत असे. मात्र, आता शहरात खरेदीचा ट्रेंड बदलत आहे. दिवाळीच्या खरेदीला वसुबारसपासून उधाण येते, पण एकदम गर्दी उसळल्यावर दुकानदारही प्रत्येक ग्राहकांकडे लक्ष देऊ शकत नाही आणि दुकानातील गर्दी पाहून ग्राहक पुढे निघून जातो. याचा फटका व्यापाºयांनाच बसतो. मागील वर्षीच्या तुलनेत ६० टक्केच उलाढाल यावर्षी झाली.
४० टक्क्यांनी व्यवसाय घटला. उल्लेखनीय म्हणजे यंदा दिवाळी दुसºया पंधरवड्यात आली. अशा वेळी उलाढाल अधिक असते, पण यंदा तसे झाले नाही.
जुन्या शहरात पार्किंगची समस्या व गर्दी यामुळे यंदा ग्राहकी मोठ्या प्रमाणात विभागल्या गेल्याचे दिसून आले. सिडको-हडको, पुंडलिकनगर, जवाहर कॉलनी, शिवाजीनगर, बीड बायपास, उल्कानगरी, उस्मानपुरा, रेल्वेस्टेशन येथील ग्राहकांनी त्याच परिसरात खरेदी करण्यास पसंती दिली. अखेरीस जुन्या शहरात एवढी गर्दी होती की, चालणेदेखील कठीण झाले होते. अशीच परिस्थिती आसपासच्या बाजारपेठेतही दिसून आली.
रेडिमेड कपडा मार्केट नंबर वन
दिवाळीत अखेरच्या टप्प्यात रेडिमेड कपडे खरेदीवर शहरवासीयांनी जोर दिला. घरातील लहानांपासून ते थोेरांपर्यंत सर्वांना कपडे खरेदी करण्यात आले. यामुळे ऐनवेळी बाजारात झुंबड उडाली होती. गर्दीमुळे अनेकांना मनासारखे कपडेही खरेदी करता आले नाहीत. कोट्यवधींची उलाढाल रेडिमेड कपडा बाजारात झाली. मात्र, कापड विक्रीला मोठा फटका बसला.
सराफा बाजारात सोने स्थिर
मागील आठवडाभरापासून सराफा बाजारात सोन्याचे भाव स्थिर होते. पाडव्याच्या दिवशी ३०,९०० रुपये प्रतितोळा सोने विक्री झाले. प्युअर सोने तसेच महिलांचे दागिने खरेदी चांगली राहिली. सराफा बाजारात पाडव्याला ग्राहकांची चहलपहल दिसून आली. तशीच परिस्थिती त्रिमूर्ती चौकात होती. जालना रोडवर शोरूमसमोर चारचाकी व दुचाकीच्या रांगा दिसून आल्या. एकंदरीत लहान सराफा व्यापाºयांसाठी दिवाळीचा काळ कठीण गेला, अशी माहिती गिरधर जालनावाला यांनी दिली.
जाधववाडीत १५० पोती नवीन मका, १०० पोती बाजरी दाखल
पाडव्याच्या मुहूर्तावर जाधववाडीतील कृउबा समितीच्या धान्य अडत बाजारात आसपासच्या ग्रामीण भागातून १५० पोती नवीन मका व १०० पोती बाजरीची आवक झाली. मुहूर्तावर मका ९०० ते ९२५ रुपये क्ंिवटलने विक्री झाला. तर बाजरीला १२०० ते १२५० रुपये प्रतिक्ंिवटल भाव मिळाला. मागील वर्षी मक्याला ७५० ते ८०० रुपये भाव मिळाला होता, अशी माहिती अडत व्यापारी हरीष पवार यांनी दिली.
सुमारे ३ हजार दुचाकी, ७५० चारचाकी रस्त्यांवर
दुचाकीचे वितरक हेमंत खिंवसरा यांनी सांगितले की, दिवाळीत धनतेरस व पाडव्यास मिळून सुमारे ३ हजार नवीन दुचाकी रस्त्यांवर आल्या. पाडव्याचा मुहूर्त असला तरी यंदा त्या अगोदरच ग्राहकांनी दुचाकी घरी नेल्या. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी होणारी विक्री यंदा अगोदरच झाली होती. दुचाकीचे वितरक अजय गांधी यांनीही यास दुजोरा दिला. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस झाल्याने त्याचा फायदा पुढील काळात होईल तेव्हा दुचाकी खरेदीला ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या अधिक असेल. चेंबर आॅफ अ‍ॅथोराईज्ड आॅटो डीलर संघटनेचे अध्यक्ष मनीष धूत यांनी सांगितले की, दिवाळीदरम्यान शहरात नवीन ७५० चारचाकी वाहनांची विक्री झाली. यातही ९५ टक्के वाहने १० लाखांखालील किमतीची विक्री झाली. पाडव्यापेक्षा दसरा व धनतेरसच्या मुहूर्तावर विक्री चांगली राहिली.

Web Title:  Satisfactory turnover in 4 days of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.