चव्हाण घालताय कार्यकर्त्यांचा मेळ, तर बोराळकरांसमोर दुहीचा घोळ

By सुधीर महाजन | Published: November 11, 2020 08:22 AM2020-11-11T08:22:41+5:302020-11-11T08:32:23+5:30

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ विश्लेषण : फडणवीस, अजित पवारांच्या ‘रामप्रहारातील’ शपथविधीचा हिशेब यावेळी चुकता करण्याच्या तयारीत भाजप आहे. राज्याच्या राजकारणाचे हे संदर्भ असले तरी मराठवाड्याच्या राजकारणाची किनार वेगळीच आहे.

Satish Chavan trying to a mix of NCP activists, while Shirish Boralkars have face splits in BJP | चव्हाण घालताय कार्यकर्त्यांचा मेळ, तर बोराळकरांसमोर दुहीचा घोळ

चव्हाण घालताय कार्यकर्त्यांचा मेळ, तर बोराळकरांसमोर दुहीचा घोळ

googlenewsNext

- सुधीर महाजन

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजले. पुन्हा एकदा दोन वेळा निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आणि भाजपचे शिरीष बोराळकर समोरासमोर आहेत. यावेळी ही केवळ खडाखडी नाही, अस्मान दाखविले जाईल. भाजपला राष्ट्रवादीची खुमखुमी जिरवायची आहे. शिवाय गेल्या पराभवाचे उट्टे काढण्याच्या तयारीत आहे. फडणवीस, अजित पवारांच्या ‘रामप्रहारातील’ शपथविधीचा हिशेब यावेळी चुकता करण्याच्या तयारीत भाजप आहे. राज्याच्या राजकारणाचे हे संदर्भ असले तरी मराठवाड्याच्या राजकारणाची किनार वेगळीच आहे.

मराठवाड्याच्या राजकारणावर असलेला शरद पवारांचा प्रभाव क्षीण होत चालला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अस्तित्व तुरळक दिसते. औरंगाबाद जिल्ह्यात तर एकही आमदार नाही. नेत्यांची फौज; कार्यकर्त्यांचा दुष्काळ आहे. सतीश चव्हाणांना पक्षांतर्गत स्पर्धा नव्हती. दुसरीकडे बोराळकर मतदारांशी संपर्क ठेवून आणि पक्षश्रेष्ठी बऱ्याच अंशी अनुकूल असतानाही प्रवीण घुगे वगळता किशोर शितोळे यांनी केलेले प्रयत्न समजू शकतो; पण कधीकाळी याच मतदारसंघातून मंत्रीपद भोगलेले आणि पुन्हा राष्ट्रवादी ते भाजप, अशी प्रदक्षिणा घालून आलेल्या जयसिंग गायकवाडांनी पुन्हा बाशिंग बाधण्याचा प्रयत्न का केला, कोडेच आहे. त्यांच्या  उचापती कोणी गांभीर्याने घेतल्या नाहीत. तो मनोरंजनाचा विषय ठरला.

उमेदवार निवडीचे गुऱ्हाळ लांबल्यानंतर भाजपअंतर्गत जाती-पातीच्या गटाचे रंग उघड झाले. कळस म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पत्रपरिषदेत ‘किशोर शितोळे माझे समर्थक होते तरी त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही’, असे विधान केले. हाच या सगळ्या लाथाळ्यांचा दुजोरा मानायचा का, असाही प्रश्न उद्भवला. ब्राह्मण, मराठा, वंजारी,  दरी स्पष्ट झाली. आता बोराळकरांकडे पक्षांतर्गत नेते व कार्यकर्त्यांचे मनोमीलन घडवून आपला मार्ग सुकर करण्याचे आव्हान आहे. आज तरी शिरीष बोराळकर हे नाराजांच्या लाटेवर स्वार झालेले दिसतात.
सतीश चव्हाण एका तपापासून आमदार आहेत. त्यांनी हा मतदारसंघ बांधला. शिक्षण संस्था हा त्यांच्या बलस्थानांचा कणा. ‘मराठा शिक्षण संस्था’ ही सतीश चव्हाणांच्या ताब्यात आहे. त्यांचे पक्षांतर्गत विरोधक मधुकरराव मुळे यांना बाजूला सारून ती चव्हाणांनी ताब्यात घेतली आणि अजित पवारांच्या जवळचे, अशी त्यांची ओळख समजली जाते. त्यांना बेरोजगार, तासिका तत्त्वावरील प्राध्यापक अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागणार. मतदार प्रश्न विचारायला लागले. हा बदल पहिल्यांदाच दिसतो. एका अर्थाने मतदार कामाचा हिशेब मागत आहेत.

शिरीष बोराळकरांसाठी अशा अडचणी नाहीत. भाजपकडे सर्वच जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांची फौज आहे. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तीतले स्वयंसेवक ही जमेची बाजू. उमेदवारीच्या वेळी नेत्यांमधील रस्सीखेच दिसली तरी आता बोराळकरांच्या मागे सर्वांना उभे राहावे लागणार आहे, नसता समाजमाध्यमांवर जे काही दुहीचे चित्र रंगवले गेले, त्याला दुजोरा मिळेल. त्यामुळे त्यांना मन मारून काम करावे लागेल.

Web Title: Satish Chavan trying to a mix of NCP activists, while Shirish Boralkars have face splits in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.