शक्तिप्रदर्शनाने सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By Admin | Published: June 1, 2014 12:51 AM2014-06-01T00:51:47+5:302014-06-01T00:55:49+5:30

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करीत रॅलीद्वारे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

Satish Chavan's candidature was filed for the candidature | शक्तिप्रदर्शनाने सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

शक्तिप्रदर्शनाने सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करीत रॅलीद्वारे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी, निघालेल्या रॅलीत मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यातून आलेले शेकडो पदवीधर मतदार सहभागी झाले होते. क्रांतीचौक येथून सकाळी ११ वाजता सतीश चव्हाण यांच्या रॅलीला सुरुवात झाली. त्याआधी शेकडो कार्यकर्ते गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा रुमाल आणि डोक्यावर टोपी घालून या ठिकाणी जमले होते. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून अनेक जीप आणि कारमधून हे कार्यकर्ते येथे पोहोचले होते. ढोल-ताशांच्या आवाजात रॅली पुढे सरकत होती. रॅलीत एका वाहनात उभे राहून उमेदवार सतीश चव्हाण तसेच आ. विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद आदी पदाधिकारी मार्गावरील नागरिकांना अभिवादन करीत होते. पुढे शेकडो कार्यकर्ते घोषणा देत पायी चालत होते. तसेच मागे अनेक गाड्यांचा ताफा आणि त्यामध्ये कार्यकर्ते होते. पैठणगेट येथे लोकमान्य टिळक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तेथून पुढे ही रॅली गुलमंडी, सिटीचौक, किलेअर्कमार्गे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पोहोचली. तोपर्यंत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, राज्यमंत्री फौजिया खान, आ. कल्याण काळे, आ. अब्दुल सत्तार, आ. अमर राजूरकर, आ. सुभाष झांबड आदी नेतेही रॅलीत सहभागी झाले होते. त्यानंतर सतीश चव्हाण यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या दालनात शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, राज्यमंत्री फौजिया खान, आ. अमर राजूरकर, नितीन बागवे यांची उपस्थिती होती. ठिकठिकाणी स्वागत क्रांतीचौकापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर निघालेल्या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सिल्लेखाना चौक, पैठणगेट, सिटीचौक आदी ठिकाणी उमेदवार सतीश चव्हाण यांना पुष्पहार घालून त्यांना शुभेच्छा दिल्या जात होत्या. काही ठिकाणी फटाकेही फोडण्यात आले. याशिवाय उन्हाचा कडाका लक्षात घेऊन रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांना पैठणगेट, सिटीचौक या ठिकाणी पाण्याचे पाऊच वाटप करण्यात आले.

Web Title: Satish Chavan's candidature was filed for the candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.