औरंगाबाद विद्यापीठाच्या अधिसभा व विद्यापरिषदेच्या निवडणुकीत आमदार सतीश चव्हाण गटाची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 09:10 PM2017-11-27T21:10:49+5:302017-11-27T21:11:04+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात झालेल्या ३७ जागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे.

Satish Chavan's decision to contest Aurangabad University's Legislature and Vidyapith election | औरंगाबाद विद्यापीठाच्या अधिसभा व विद्यापरिषदेच्या निवडणुकीत आमदार सतीश चव्हाण गटाची बाजी

औरंगाबाद विद्यापीठाच्या अधिसभा व विद्यापरिषदेच्या निवडणुकीत आमदार सतीश चव्हाण गटाची बाजी

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात झालेल्या ३७ जागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. अधिसभा आणि विद्यापरिषदेच्या ३७ पैकी तब्बल २७ जागा आमदार सतीश चव्हाण समर्थक उत्कर्ष पॅनलला मिळाल्या असल्याचा दावा विजयी उमेदवार डॉ. राजेश करपे यांनी केला आहे. तर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांनी आक्षेप घेण्यात आलेल्या ५ जागांची मतमोजणी पूर्ण झाली असून, निकाल राखीव ठेवल्याचे सांगितले.

विद्यापीठाच्या अधिसभेच्या २९ आणि विद्यापरिषदेच्या ८ जागांची मतमोजणी दोन दिवसांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर पूर्ण झाली आहे. यात पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनलला अधिसभेत २० आणि विद्यापरिषदेच्या ७ जागा जिंकल्या असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. यातील महाविद्यालयीन प्राध्यापक गटातील आरक्षित पाच जागांचे निकाल राखीव ठेवले असले तरी त्या जागांच्या मतमोजणीत सर्व जागांवर उत्कर्ष पॅनलच्या उमेदवरांना तीनशे पेक्षा अधिक मताधिक्य मिळाले असल्याचे डॉ. राजेश करपे यांनी सांगितले. विद्यापीठ विकास मंचचा प्राचार्य गटात चार, प्राध्यापकात दोन आणि विद्यापरिषदेत एक उमेदवार विजयी झाला आहे.

कोणतेही कारण नसताना रात्री गोंधळ
मतमोजणी कक्षात बसविण्यात आलेला टेबल तुटल्यामुळे काही मतपत्रिका बाजुला ठेवल्या होत्या. यात एका केंद्राच्या ८३ मतपत्रिकांचा समावेश होता. आरक्षित प्रवर्गातील जागांमध्ये  दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत असल्यामुळे या मतपत्रिकांचा आकडा जुळवला नाही. त्याकडे दोन्ही गटांच्या उमेदवारांनीही लक्ष वेधले नाही. मात्र खुल्या प्रवर्गातील मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एकूण मतपत्रिकांमध्ये ८३ मतपत्रिका कमी भरत असल्याचे लक्षात आले. तेव्हा शोधाशोध केली असता, एका मतपेटीत ८३ मते सापडली. त्यात आरक्षित प्रवर्गातील मतपत्रिकाही होत्या. मात्र आरक्षित प्रवर्गाची मतमोजणी पूर्ण झाली होती. तेव्हाच एका गटाच्या  उमेदवारांनी मतमोजणी थांबवत मतदान पुन्हा घेण्याची मागणी केली. ही मागणीच कायद्याला धरुन नव्हती. यामुळे पोलिस सरंक्षणात आरक्षित प्रवर्गातील मतपत्रिका सिलबंद केल्या असल्याचे डॉ. साधना पांडे यांनी सांगितले. एका दिवसानंतर दोन्ही गटाला बोलावून तोडगा सांगण्यात येईल. मान्य न झाल्यास प्रशासन योग्य तो निर्णय घेत निकाल जाहीर करेल. आमच्याकडे सर्व प्रकारचे सिसिटीव्ही फुटेज उपलब्ध असून, मतपत्रिका बाहेरुन आणून टाकल्या हा आरोप चुकीचा असल्याचेही डॉ. पांडे म्हणाल्या.

पुन्हा मतदान घेण्याची मागणी
विद्यापीठाच्या अधिसभा व विद्यापरिषदेच्या निवडणुकीत प्रचंड गैरप्रकार झाले आहेत. कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे हे पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्या दबावात सर्व निर्णय घेत आहेत. मतमोजणीच्या दिवशीही मध्यरात्री विज घालविण्यात आली. त्याचवेळी काही मतपत्रिका पळवून घेऊन जात असताना प्रवेशद्वारावर पकडण्यात आल्याचा आरोप करत अधिसभा व विद्यापरिषदेची फेरनिवडणूक घेण्याची मागणी विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक डॉ. गजानन सानप यांनी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तत्पूर्वी कुलगुरू, निवडणूक निर्णय अधिका-यांनाही मंचतर्फे निवेदन देण्यात आले. यात निवडणूक निर्णय अधिका-यांनी महाविद्यालयीन प्राध्यापक गटातील  निकाल राखीव ठेवल्याचे पत्रही मंचच्या उमेदवारांना दिले.

पराभव झाल्यामुळे बेछूट आरोप
विद्यापीठ विकास मंचने राज्य सरकार, केंद्र सरकारमधील असलेल्या सत्तेच्या जोरावर विजयी होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र ते धुळीस मिळाल्यामुळे आमदार सतीश चव्हाण यांच्यावर बेछूट आरोप करण्यात येत असल्याचे उत्कर्ष पॅनलचे निमंत्रक डॉ. शिवाजी मदन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच उत्कर्ष पॅनलचा दणदणीत विजय झाला असून, आगामी पाच वर्षात विद्यार्थी हिताचे निर्णय घेत विद्यापीठाला गतवैक्षव मिळवून देणार असल्याचे सांगितले.

Web Title: Satish Chavan's decision to contest Aurangabad University's Legislature and Vidyapith election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.