शेतकऱ्यांचा सत्याग्रह; सर्व कर्जमुक्तीची मागणी
By Admin | Published: May 4, 2016 01:18 AM2016-05-04T01:18:12+5:302016-05-04T01:29:21+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतमालाचे भाव आणि संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अ. भा. किसान सभेतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर
औरंगाबाद : मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतमालाचे भाव आणि संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अ. भा. किसान सभेतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या बेमुदत ‘आक्रोश सत्याग्रहा’ला मंगळवारपासून सुरुवात झाली. मराठवाड्यातून आलेल्या हजारो शेतकरी आंदोलकांना माघार घेण्यासाठी विभागीय प्रशासनाकडून उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी विनवणी केली; परंतु त्यांनी माघार घेतली नाही. शेतकऱ्यांनी रात्रभर मुक्कामी आंदोलन सुरू केले.
मुख्यमंत्री चर्चेसाठी तारीख देत नाहीत तोपर्यंत सत्याग्रह सुरू राहणार असल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय सहसचिव डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्य किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे शेतकऱ्यांनी महामुक्काम आंदोलन केले.
या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने १५ दिवसांत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले; परंतु एकही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे औरंगाबादेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आजपासून बेमुदत शेतकरी आक्रोश सत्याग्रह सुरू केला आहे. संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, खरीप हंगामात मोफत बियाणे, खते, रोहयोमध्ये पेरणी, खुरपणी, काढणी या कामांचा समावेश करावा, मागेल त्याला मग्रारोहयोमध्ये काम उपलब्ध करून द्यावे. नसता प्रतिदिन ३०० रुपये मानधन द्यावे, सर्व कष्टकऱ्यांना २ रुपये भावाने महिन्याला १० किलो धान्य द्यावे, आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना ५ लाख रुपये मदत द्यावी, दुष्काळी अनुदानाचे तात्काळ वाटप करावे, पिण्यासाठी जनावरांसाठी गावोगाव पाण्याची व्यवस्था करावी, जनावरांच्या चाऱ्यासाठी प्रतिदिन रोख ८० रुपये अर्थसाह्य द्यावे. आदी मागण्यांसाठी सत्याग्रह केला जात आहे. सत्याग्रहात किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ. ढवळे, राज्याध्यक्ष दादा रायपुरे, जे. पी. गावीत, किसान गुजर, अर्जुन आडे, डॉ. विठ्ठल मोरे, रामकृष्ण शेरे, डॉ. नवले, उद्धव पौळ, विलास बाबर, लिंबाजी कचरे, दीपक लिपणे, भाऊसाहेब झिरपे आदींसह शेतकरी सहभागी झाले आहेत. या सत्याग्रहाला डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. राम बाहेती, लक्ष्मण भोजणे यांनी पाठिंबा दिला आहे.
मागण्या मान्य झाल्या तरच माघार
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी किसान सभेसोबत चर्चेची तयारी दर्शवली होती; परंतु त्यांनी वेळ दिला नाही. जोपर्यंत मुख्यमंत्री चर्चा करणार नाही आणि मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा सत्याग्रह सुरूच राहणार असल्याचे डॉ. ढवळे यांनी सांगितले. उद्या ४ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाचे कामकाज बंद करण्याचा इशारा डॉ. नवले यांनी दिला.