साऊथसिटीसह सिडको परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:30 PM2019-03-18T22:30:17+5:302019-03-18T22:30:29+5:30
सिडको वाळूज महानगर २ मधील साऊथसिटी व परिसरात चोरट्यांनी शनिवारी रात्री धुमाकूळ घातला.
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर २ मधील साऊथसिटी व परिसरात चोरट्यांनी शनिवारी रात्री धुमाकूळ घातला. एकाच रात्रीत चोरट्यांनी चार घरे फोडल्याचे रविवारी उघडकीस आली. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
वाळूज महानगरात काही दिवसांपासून चोरीच्या घटना सुरुच आहेत. आठवडाभरापूर्वी साऊथसिटीत दोन घरे फोडल्याची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी पुन्हा साऊथसिटी व सिडको वाळूज महानगर २ परिसरात एकाची रात्री चार घरे फोडल्याची घटना रविवारी उघडकीस आली. पण नागरिकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा किंमती ऐवज व रोख रक्कम पळविण्याचा प्रयत्न पसला आहे. कैलास निकम यांच्या घराच्या दरवाजाचा मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास जोरात आवाज झाली. निकम यांनी उठून पाहिले असता घराचा दरवाजा तुटलेला व काही व्यक्ती अंधाराच्या दिशेने पळताना दिसून आले. त्यानंतर चोरट्यांनी इमामोद्दीन अब्दुल शेख यांच्या घराकडे मोर्चा वळविला.
कपाटातील सामानाची झडती घेत असताना हॉलमध्ये कुटुंबियासह झोपलेल्या शेख यांना जाग आली. घरमालक उठल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी सामान तसेच ठेवून तेथून पळ काढला. त्यानंतर चोरट्यांनी डॉ. राहुल कुलकर्णी यांच्या घराच्या किचनचा दरवाजा तोडला. व किचनमधील डब्याची झडती घेतली. मात्र हाती काहीच लागले नाही. त्यामुळे चोरट्यानी दुसऱ्या खोलीकडे आपला मोर्चा वळविला. टॉमीच्या सहाय्याने दुसऱ्या खोलीचे कुलूप तोडत असताना डॉ. कुलकर्णी यांना जाग आली. खोलीच्या दिशने कुलकर्णी यांनी जाऊन पाहिले असता चोरट्यांनी तेथून पळ काढला. तिन्ही ठिकाणी काहीच न मिळाल्याने चोरट्याने जलकुंभा शेजारी रहाणारे सुभाष जबोत्रा यांचे घराचे कुलूप तोडून कपाटातील झडती घेतली. परंतू कपाटात काहीच हाती न लागल्याने चोरट्यानी कपाटातील जबोत्रा यांच्यासह कुटुंबियांचे कपडे लंपास केले.