'मला वाचवा'; दारूड्याच्या फोनने उडाली तांराबळ, पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 01:20 PM2023-03-27T13:20:11+5:302023-03-27T13:20:25+5:30
खोडसाळपणा आला समोर; काहींनी मारहाण करून चाकूने वार केल्याचा फोन पोलिसांना केला होता
करंजखेड ( छत्रपती संभाजीनगर) : आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या पोलिसांच्या ११२ नंबरवर एकाने शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ३ वेळा फोन करून काही जणांनी आपणास मारहाण करून चाकूने वार केले आहेत. मला वाचवा, अशी मदतीची याचना केली. त्यामुळे पोलिस घटनास्थळी पोहोचले असता एका दारुड्याने बेधुंद होऊन हा सर्व खोडसाळपणा केल्याचे समोर आले आहे. ही घटना कन्नड तालुक्यातील वाकोद येथे घडली.
वाकोद येथील रावसाहेब रामराव मनगटे (वय ३५ वर्षे) याची पत्नी माहेरी गेली आहे. त्यामुळे त्याने शुक्रवारी मनसोक्त दारू ढोसली. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत तीन वेळा नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या ११२ या पोलिसांच्या आपत्कालीन नंबरवर मोबाइलवरून फोन केला. फोनवर त्याने आपणास काही जण मारहाण करीत आहेत. आपल्यावर चाकूने वार केले आहेत. मला वाचवा, अशी मदतीची याचना करणारे फोन केले. छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या मुख्यालयी असलेल्या कंट्रोल रूममध्ये हा फोन आल्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली. याबाबत कंट्रोल रूममधून तातडीने पिशोर पोलिस ठाण्यास माहिती देण्यात आली. पोलिसांनी या फोनचे लोकेशन तपासले, तेंव्हा कन्नड तालुक्यातील वाकोद शिवारातील गट नं. ४५४ मध्ये लोकेशन आढळले. त्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक संबंधित ठिकाणी गेले असता रावसाहेब मनगटे दारू पिऊन बेधुंद असल्याचे दिसून आले. यावेळी त्याच्या हातात चाकू होता. तो असंबद्ध बडबड करीत होता.
पोलिसांनी शिताफीने काढून घेतला चाकू
यावेळी पोलिसांनी शिताफीने त्याच्या हातातून चाकू काढून घेतला. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात आणले. यावेळी त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपणास कोणीही मारहाण केली नाही, असे सांगितले. माझी बायको माहेरी गेली आहे. मी स्वतःच्या पोटाला वरखडा मारला असल्याचेही सांगितले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्याविरूद्ध पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी व हत्यार बाळगल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. याकामी पोलिस कर्मचारी सुनील भिवसणे, साईनाथ घुगे, लालंचद नागलोत, संदीप चव्हाण, वसंत पाटील यांनी कर्तव्य बजावले.