भारीच! प्रमाणपत्रांसाठी वेळ, पैसा वाचला; एक लाख डिजिटल प्रमाणपत्रांचे वाटप
By विकास राऊत | Published: February 21, 2024 07:41 PM2024-02-21T19:41:18+5:302024-02-21T19:41:37+5:30
अर्ज केल्यानंतर सर्व कागदपत्रे योग्य असतील तर जात प्रमाणपत्र २१ दिवसांत मिळते.
छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरून वर्षभरात शहर व तालुक्यासह एक लाखाच्या आसपास प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. यामध्ये महसूल विभागासह, भूमी अभिलेख व इतर विभागाकडून देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांचा समावेश आहे.
८० हजार २८० प्रमाणपत्रे ‘सेतू’मधून वितरित झाली आहेत; तर २० हजार प्रमाणपत्रे भूमी अभिलेखमधून वितरित झाली आहेत. वर्षात जिल्ह्यात उपविभागीय व तहसीलदारांच्या स्वाक्षरीने सुमारे ८० हजार जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १० हजारांनी वाढले आहे. अर्ज केल्यानंतर सर्व कागदपत्रे योग्य असतील तर जात प्रमाणपत्र २१ दिवसांत मिळते.
कोणकोणती प्रमाणपत्रे मिळतात ऑनलाइन?
महसूल विभाग : सातबारा, जात, रहिवासी, उत्पन्न व इतर
भूमी अभिलेख : जमीनमोजणीची प्रमाणपत्रे मिळतात.
वर्षभरात १ लाख प्रमाणपत्रांचे वाटप
गेल्या वर्षभरात सर्व विभागांचे मिळून एक लाखाच्या आसपास प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचा अंदाज आहे. महसूल प्रमाणपत्र काढण्यासाठी वेगवेगळी प्रमाणपत्रे काढावी लागतात. त्यासह हा आकडा असल्याचा दावा आहे.
किती प्रमाणपत्रांचे वाटप?
प्रमाणपत्र ............... किती केले वाटप?
रहिवासी ................... ३१०२५
उत्पन्न .................. ३२५४२
वय अधिवास .......... ३३३२
इतर .................. ८५५३
जात प्रमाणपत्र ..... ३००५
नॉन क्रिमिलेअर ...... १८२३
एकूण ....... ८०२८०
तातडीने प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न
अर्जदारांनी कोणत्याही प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर जोडलेली सर्व कागदपत्रे योग्य असतील तर ५ ते २१ दिवसांत प्रमाणपत्र देण्यात येते. २१ दिवसांत देण्याचा प्रयत्न अर्जदाराने सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडली असल्यास सेवा हमी कायद्यानुसार २१ दिवसांत प्रमाणपत्र देण्यात येते. काही कागदपत्रांत त्रुटी असतील तर हा कालावधी वाढतो.
- जिल्हा प्रशासन, छत्रपती संभाजीनगर