'पाण्यापासून वाचविले, आगीने गिळंकृत केले'; शॉर्टसर्किटने जळाले मजुराचे ४८ हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 03:04 PM2021-07-19T15:04:48+5:302021-07-19T15:06:53+5:30
मातीची भिंत सतत ओली होते म्हणून ती पाडून सिमेंटमध्ये बांधण्यासाठी विनायक प्रयत्न करीत होते.
- सचिन लहाने
औरंगाबाद : दिवस-रात्र मेहनत करून दोन वर्षात पै-पै जमा केलेले ४८ हजार रुपये व महत्त्वाच्या कागदपत्रांची विजेच्या स्वीच बोर्डाला लटकवलेली कॅरी बॅग स्पार्किंग होऊन पेटली. त्यासोबतच एका मजुराचे घराची एक भिंत बांधण्याचे स्वप्नही करपले.
अशोकनगर, शहाबाजार परिसर ही हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांची वसाहत. या वसाहतीतून वाहणाऱ्या नाल्याच्या काठावर विनायक वाहूळ यांचे वडिलोपार्जित ५० वर्षाहून अधिक जुने मातीचे घर आहे. ओढा सतत वाहता असून, पावसाळ्यात त्याला पूर येतो. मातीची भिंत सतत ओली होते म्हणून ती पाडून सिमेंटमध्ये बांधण्यासाठी विनायक प्रयत्न करीत होते. ते हातमजूर आहेत. भिंत बांधण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी पै-पैका जमा करणे सुरू केले. कोरोना काळातही त्यांनी पोटाला चिमटा घेत ४८ हजार रुपये जमा केले. घरात पावसाचे पाणी शिरते म्हणून दोन दिवसांपूर्वीच ही रक्कम, मुलांचे व त्यांचे स्वत:चे आधारकार्ड व अन्य शैक्षणिक प्रमाणपत्रे एका प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये ठेवली. ही बॅग घरातील विजेच्या स्वीच बोर्डाला लटकवली. रविवारी दुपारी अचानक स्पार्किंग झाले व या बोर्डाने पेट घेतला. त्यात कॅरीबॅग जळाली. नोटा, प्रमाणपत्रे अर्धवट जळाली. दोन वर्षांचे परिश्रम आगीने क्षणार्धात स्वाहा केले. हे पाहून विनायक व त्यांचे कुटुंबीय खिन्न होऊन बसले.
लोकमतशी बोलतांना ते म्हणाले की, भिंत बांधण्यासाठी कष्टाने पैसा जमवला. मिळेल ते काम केले. पालिकेच्या कचरा घंटागाडीवर रोजंदारी केली. दोन दिवसांपासून पाऊस पडतोय. घरात पाणी येतेय. त्यामुळे पैसे व महत्त्वाची कागदपत्रे वर सुरक्षित ठेवली. तीच जळाली. आता काय करणार, असे हताश उद्गार त्यांनी काढले.