सावित्रीच्या लेकींचा बोलबाला!
By Admin | Published: May 31, 2017 12:28 AM2017-05-31T00:28:36+5:302017-05-31T00:30:38+5:30
उस्मानाबाद :बारावीच्या निकालात यंदाही सावित्रीच्या लेकींचा बोलबाला आहे. ९०.८० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून हे प्रमाण ७९.६१ टक्के इतके आहे.
उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८४.२२ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत किंचितशी म्हणजेच ०.८३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. निकालात यंदाही सावित्रीच्या लेकींचा बोलबाला आहे. ९०.८० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून हे प्रमाण ७९.६१ टक्के इतके आहे.
बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी यंदा जिल्हा प्रशासनाने कंबर कसली होती. प्रत्येक केंद्रावर बैठे पथक तैनात करण्यात आले होते. एवढेच नाही तर तब्बल नऊ भरारी पथके स्थापण्यात आली होती. यंदा पहिल्यांदाच एका परीक्षा केंद्रावर दुसऱ्या केंद्रातील पर्यवेक्षक नेमण्यात आले होते. त्याचप्रमाणे उपद्रवी केंद्रांना अधिकचे पोलिसबळ पुरविण्यात आले होते. त्यामुळे जिल्हाभरातील सर्वच केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षेदम्यान बारा कॉपीबहाद्दरांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. कॉपीमुक्त अभियानामुळे यंदा जिल्ह्याच्या निकालाचा टक्का मोठ्या प्रमाणात खाली येईल, असा अंदाज शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात होता. परंतु, मंगळवारी आॅनलाईन निकाल जाहीर झाला असता, किंचितशी घसरण झाल्याचे समोर आले. गतवर्षीच्या तुलनेत केवळ ०.८३ टक्के निकाल कमी लागला आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी जिल्हाभरातील सुमारे १७ हजार १४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात १६ हजार ९५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, असता १४ हजार २९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याचे प्रमाण ८४.३२ टक्के एवढे आहे. मुला-मुलींच्या उत्तीर्णतेच्या प्रमाणावर नजर टाकली असता, मुलीच सरस ठरल्या आहेत. परीक्षेसाठी ९ हजार ९५२ मुलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ८१६ मुलांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली असता ७ हजार ८१५ मुले उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७९.६१ टक्के इतके आहे. तर दुसरीकडे ७ हजार १६२ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यापैकी ७ हजार १४० मुलींनी परीक्षा दिली असता ६ हजार ४८३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.८० टक्के आहे. दरम्यान, शाखानिहाय निकालावर नजर टाकली असता, विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९३.६ टक्के निकाल लागला आहे. जिल्हाभरातील ६ हजार ७७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरला होता. यापैकी ६ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली असता ६ हजार २९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेच्या ७ हजार १११ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील ७ हजार ८१ जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यापैकी ५ हजार ३७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७५.९६ टक्के इतके आहे. तब्बल १ हजार ७०८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचीही यापेक्षा काही वेगळी स्थिती नाही. १ हजार ८८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा फार्म भरला होता. यातील १ हजार ८७९ जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली असता, १ हजार ६२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.५९ टक्के आहे. दरम्यान, व्होकेशनल शाखेच्या १ हजार २४० पैकी १ हजार २३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असता १ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे प्रमाण ८०.९७ टक्के आहे.