सव्वादोन वर्षामध्ये साडेतीनशे शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
By Admin | Published: March 10, 2017 12:29 AM2017-03-10T00:29:55+5:302017-03-10T00:30:59+5:30
उस्मानाबाद : दुष्काळ, नापिकी आणि डोक्यावरील कर्जाचा बोझा काही केल्या हलका होत नसल्याने मागील सव्वादोन वर्षात ३५२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.
उस्मानाबाद : दुष्काळ, नापिकी आणि डोक्यावरील कर्जाचा बोझा काही केल्या हलका होत नसल्याने मागील सव्वादोन वर्षात थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल ३५२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. दर दोन ते अडीच दिवसाला एक शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्कारत आहे. आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाकडून पॅकेज जाहीर करण्यात आले. परंतु, तातडीने अंमलबजावणी करण्याचे सोडून केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळेच की काय, शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. हे विदारक चित्र लक्षात घेऊन तरी शासनाने ठोस पाऊले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हा व परिसरात मागील काही वर्षापासून अवेळी व अपुऱ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ खरीप या प्रमुख हंगामासह रबीतील पिकेही शेतकऱ्यांच्या हाती लागलेली नाहीत़ त्यातच जिल्हा बँक डबघाईला आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक पतपुरवठा बंद पडला आहे़ राष्ट्रीयकृत बँका कर्जपुरवठा करीत नसल्याने शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून कर्ज घ्यायची वेळ आली़ खासगी सावकारांच्या कर्जाचा डोंगर, दुष्काळ, सततच्या नापिकीमुळे हाती न पडणारे उत्पन्न, मुला-मुलींच्या लग्नासह शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च अशा एक ना आनेक कारणांनी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे़ सन २०१५ मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक १६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ राज्यातील सर्वाधिक आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबादचे नाव नोंदले गेले होते. त्यानंतर सन २०१६ मध्येही १६१ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली़ शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबविण्यासाठी शासनाने बळीराजा चेतना अभियानासह इतर शासकीय उपाययोजना राबविल्या़ मोफत शेतीउपयोगी साहित्य वाटपासह रोखीने काही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आली़
गतवर्षी परतीच्या पावसाने तीन वर्षाचा दुष्काळ वाहून गेला़ जिल्ह्यातील लहान-मोठे सर्वच प्रकल्प तुडंूंब भरले. खरिपातील पिके काढण्याच्या कालावधीतच दमदार पाऊस झाल्याने सोयाबीनसह इतर पिकांचे अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही़ जे काही हाती लागले, त्याला बाजारपेठेत अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले होते. या संकटानेही न डगमगता शेतकऱ्यांनी रबी रबीची पेरणी केली. परंतु, शेतीमाल बाजारपेठेत येताच दरामध्ये झपाट्याने घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.
परिणामी शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर काही केल्या कमी होत नाही. या सर्व कारणामुळे शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलित आहेत. चालू वर्षात आजवर २७ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. यापैकी केवळ दहा प्रकरणेच शासनाकडून मंजूर करण्यात आली आहेत. त्यांना आर्थिक मदतही देण्यात आली आहे. तर पाच प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत. बारा प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे़
२ कोटी १६ लाखाची मदत
मागील सव्वादोन वर्षात दाखल प्रस्तावांपैकी २६० प्रस्तावांना प्रशासनाने मंजुरी देऊन २ कोटी १६ लाखाची मदत दिली आहे़ यात सन २०१५ मध्ये ९८ प्रकरणे मंजूर करून ९८ लाखांची, २०१६ मध्ये १०८ प्रकरणे मंजूर करून १ कोटी ८ लाखांची तर चालू वर्षात १० प्रकरणे मंजूर करून १० लाखाची मदत संबंधित मयत शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यात आली आहे़ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे़(प्रतिनिधी)