सावंत-पाटील यांच्या पुणे भेटीने राजकीय वर्तुळात पुन्हा तर्कवितर्क
By Admin | Published: January 1, 2017 11:32 PM2017-01-01T23:32:29+5:302017-01-01T23:36:18+5:30
परंडा :माजी आ. ज्ञानेश्वर पाटील यांनी पुण्यात शिवसेना उपनेते आ. प्रा. तानाजी सावंत यांची भेट घेतली
परंडा : माजी आ. ज्ञानेश्वर पाटील यांचे समर्थक जहीर चौधरी यांनी आ. प्रा. तानाजी सावंत यांच्यावर गटबाजीचा आरोप करीत भाजपात प्रवेश केल्यानंतर पाटीलही लवकरच भाजपात दाखल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, रविवारी पाटील यांनी पुण्यात शिवसेना उपनेते आ. प्रा. तानाजी सावंत यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे स्पष्ट नसले तरी या भेटीच्या अनुषंगाने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे.
प्रा. तानाजी सावंत यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्यानतंर जिल्ह्यातील शिवसैनिकांत प्रा. सावंत यांचा शब्द अखेरचा मानला जाऊ लागला. पालिका निवडणुकीत प्रा. सावंत यांनी फारसा हस्तक्षेप केला नसला तरी दोन मर्जीतील शिवसैनिकांना एबी फॉर्म नावे टाकून तर इतर कोरे एबी फॉर्म ज्ञानेश्वर पाटील यांच्या स्वाधिन केले होते. त्यानतंर आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांचे अर्ज स्वीकारणाऱ्या बैठकीची सुत्रे गटनेते दत्ता साळुंके यांच्याकडे दिली होती. दरम्यान, प्रा. सावंत यांच्यामुळेच पालिका निवडणुकीत पराभव झाल्याचा आरोप ज्ञानेश्वर पाटील यांनी केला होता. यानतंर पराभूत झालेल्या सेनेच्या उमेदवारांनीही याच आरोपाची री पत्रकार परिषदेत ओढली होती. ज्ञानेश्वर पाटील यांचे समर्थक अॅड. जहीर चौधरी यांनीही सेनेचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्याने माजी आमदार ज्ञानेश्वर पाटीलही पुढील काळात समर्थकांसह भाजपात दाखल होतील, असा कयास बांधला जात होता. या घडामोडी सुरू असतानाच ज्ञानेश्वर पाटील यांनी पुणे येथे जाऊन माजी आमदार ओमराजे निंबाळकर व काँग्रेसचे सुनील चव्हाण यांच्यासह आ. प्रा. तानाजी सावंत यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे उघड सांगण्यास कोणीही तयार नसले तरी ज्ञानेश्वर पाटील शिवसेनेतच थांबणार, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, आ. पाटील भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याचे म्हणत असले तरी सत्य लवकरच समोर येवू शकते. (वार्ताहर)