उल्लेखनीय सेवेबद्दल सावंत, साबळे यांना पोलीस महासंचालकांचे पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:43 PM2019-04-24T13:43:09+5:302019-04-24T13:44:00+5:30
पोलीस दलात उल्लेखनीय सेवा केल्याबद्दल पदक जाहीर झाले.
औरंगाबाद : पोलीस दलात उल्लेखनीय सेवा केल्याबद्दल गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना आणि नुकतेच पिंपरी चिंचवड येथे बदलून गेलेले पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर झाले.
सावंत हे १९९३ साली पोलीस दलात उपनिरीक्षकपदी रुजू झाले. २५ वर्षांच्या कालावधीत त्यांनी वर्धा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, राज्य गुप्ता वार्ता, विशेष सुरक्षा विभाग औरंगाबाद येथे काम केले. औरंगाबाद शहर पोलीस दलात गुन्हे शाखेचे निरीक्षक म्हणून २०१६ पासून कार्यरत आहेत. या कालावधीत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठांकडून तब्बल २९० बक्षिसे आणि ७२ प्रशस्तीपत्रे मिळाली. आजपर्यंतच्या सेवाकालावधीत त्यांना एकही शिक्षा झाली नाही.
गुन्हे शाखेत कार्यरत असल्यापासून त्यांनी खुनाचे १२ गुन्हे उघडकीस आणून आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दरोड्याच्या तयारीतील ५ गुन्हे, बलात्काराचे २, जबरी चोरीचे २९, मंगळसूत्र चोरीचे १३, तर घरफोडीचे ६६ गुन्हे उघडकीस आणली. वाहनचोरी, मोबाईलचोरी, चोरीचे १८६ गुन्हे उघडकीस आणून ३१३ आरोपींना अटक केली. या आरोपींकडून तब्बल ७ कोटी ५६ लाख ७३ हजार १०१ रुपयांचा ऐवज जप्त केला. यासोबत अन्य अवैध धंदे करणाऱ्या ५९० जणांना अटक करून त्यांच्याकडून १ कोटी ४४ लाख २ हजार ९३२ रुपयांचा ऐवज जप्त केला.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे नुकतेच बदलून गेलेले पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे हे दोन वर्षांपासून औरंगाबादेत कार्यरत होते.