खरिपासाठी सव्वालाख मेट्रिक टन खताचा प्रस्ताव
By Admin | Published: May 14, 2017 12:34 AM2017-05-14T00:34:08+5:302017-05-14T00:34:52+5:30
लातूर : गतवर्षीप्रमाणे यंदाही वेळेवर आणि अपेक्षित पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची लगबग सुरू केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : गतवर्षीप्रमाणे यंदाही वेळेवर आणि अपेक्षित पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची लगबग सुरू केली आहे़ या हंगामासाठी कृषी विभागही सज्ज झाला असून, १ लाख २६ हजार ४९० मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे़ गतवर्षीचा आणि गत महिन्यात पुरवठा झालेला एकूण ३५ हजार ७१० मेट्रिक टन खत सध्या उपलब्ध आहे़
गतवर्षी भीषण दुष्काळ असतानाही उन्हाची तीव्रता मात्र अधिक जाणवत नव्हती़ परंतु, यंदा पाणी उपलब्ध असतानाही उन्हाची तीव्रता वाढली आहे़ तापमानाचा पारा ४२ अंशाच्या पुढे गेला आहे़ अशा परिस्थितीतही शेतकरी सध्या खरीप हंगामाची जोरदार तयारी करीत आहेत़ सध्या शेतीतील नांगरणी, मोगडणे, कुळवणे, धसकट वेचणे आदी मशागतीची कामे सुरू आहेत़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा या यंत्राद्वारे नांगरणीचा दरही वाढला आहे़ खरीप हंगाम जवळ येऊ लागल्याने अधिक शेती असलेल्या शेतकऱ्यांकडून हंगामातील साहित्याची जुळवाजुळवही सुरू केली आहे़
जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे़ खरीप हंगामासाठी कृषी विभागही सज्ज झाला असून, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने या हंगामासाठी १ लाख २६ हजार ४९० मेट्रिक टन खताचा प्रस्ताव सादर केला आहे़ आयुक्तांकडून ६० हजार ३०० मेट्रिक टन रासायनिक खतास मंजुरी मिळाली आहे़ गतवर्षीचा २८ हजार ८९८ मेट्रिक टन खत शिल्लक आहे़ तर गत महिन्यात ६ हजार ८१२ मेट्रिक टन खत उपलब्ध झाला आहे़