‘हैदराबाद मुक्तिसंग्राम म्हणा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:16 AM2017-09-18T00:16:46+5:302017-09-18T00:16:46+5:30
केवळ मराठवाडा मुक्तिसंग्राम असे म्हटले जाते, हे चुकीचे असल्याची खंत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रा. दिनकर बोरीकर यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रझाकारी निजामाच्या जोखडातून हैदराबाद संस्थानच्या मुक्तीसाठी लढा उभारला होता. या लढ्याला आता मराठवाडा मुक्तिसंग्राम असेही नाव पडत आहे. मात्र, हा मराठवाडा नव्हे तर हैदराबाद मुक्तिसंग्राम होता. एकूण १६ जिल्ह्यांसाठी लढला. आता केवळ मराठवाडा मुक्तिसंग्राम असे म्हटले जाते, हे चुकीचे असल्याची खंत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रा. दिनकर बोरीकर यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या गौरव समारंभाचे आयोजन नाट्यगृहात केले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए . चोपडे, तर प्रा. दिनकर बोरीकर प्रमुख पाहुणे होते. या समारंभात हैदराबाद मुक्तिसंग्रामात उल्लेखनीय कार्य केलेले स्वातंत्र्यसैनिक पन्नालाल मंगीलाल गंगवाल आणि नागोराव विठ्ठलराव देशपांडे यांचा कुलगुरूंच्या हस्ते शाल, मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रा. बोरीकर म्हणाले, कोणत्याही संघटित समाजाचा विकास होत असतो. निजामाच्या विरोधात हैदराबाद संस्थानातील सर्व जाती, धर्मातील लोक संघटित होऊन लढले. यामुळे यश मिळाले. आताही समाजाचा विकास करण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन लढा देण्याची गरज असल्याचेही प्रा. बोरीकर यांनी स्पष्ट केले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. यात त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामातील घटनांना उजाळा दिला. या कार्यक्रमात पन्नालाल मंगीलाल गंगवाल यांनी वाढत्या वयामुळे मनोगत व्यक्त केले नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी केले. विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमापूर्वी नाट्यगृह परिसरात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक डॉ. मुस्तजीब खान, प्रकाश आकडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.