मांजाला नाही म्हणा ! पतंगाच्या नायलॉन मांजाने कापला गेला दुचाकीचालक महिलेचा गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 12:39 PM2022-01-06T12:39:44+5:302022-01-06T12:40:53+5:30
गुलमंडी ते मॅचवेल दरम्यान अचानक पतंगाचा नायलॉन मांजा त्यांच्या गळ्यात अडकला.
औरंगाबाद : बाजारात खरेदी करून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वार महिलेचा पतंगाच्या नायलॉन मांज्याने गळा कापला गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी गुलमंडीवर घडली. या घटनेत जखमी झालेल्या महिलेवर पदमपुरा परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
शुभांगी सुनील वारद (४५, रा. क्रांती चौक परिसर) असे जखमी महिलेचे नाव आहे. शुभांगी या बुधवारी सायंकाळी गुलमंडी परिसरात खरेदीसाठी गेल्या हाेत्या. खरेदी झाल्यानंतर त्या दुचाकी घेऊन घरी निघाल्या असता गुलमंडी ते मॅचवेल दरम्यान अचानक पतंगाचा नायलॉन मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. कुणी तरी हा दोरा ओढल्यासारखे झाल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून दुचाकी थांबवून गळ्यात अडकलेला दोर पकडला. तोपर्यंत त्यांचा गळा चिरला गेल्याने झालेल्या जखमेतून रक्त निघू लागले. ही बाब त्यांनी त्याच्या पतीला सांगितली.
यानंतर ॲड. सुनील वारद यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमी पत्नीला पदमपुरा परिसरातील खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी शुभांगी यांच्यावर उपचार केले. याविषयी ॲड. वारद म्हणाले की, नायलॉन मांजावर न्यायालयाने बंदी घातली आहे. असे असताना पतंगबाजी करणारे नायलॉन अथवा काचेचा दोरा वापरतात. हे दोरे धोकादायक आहेत. नागरिकांनी वाहन चालविताना पतंगाचा दोरा गळ्यात अडकणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.