नायलॉन मांजास नाही म्हणा! युवकाच्या गळ्याला ३ इंच लांब,१ इंच खोल जखम, बोटे चिरली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 08:36 PM2023-01-14T20:36:48+5:302023-01-14T20:37:31+5:30
प्लास्टिक सर्जरी करून डॉक्टरांनी त्याचा जीव वाचविला.
औरंगाबाद : स्पर्धा परीक्षा देऊन दुचाकीने घराकडे जाणाऱ्या युवकाच्या गळा नायलॉन मांजाने गंभीररित्या कापला गेला. जळगावरोडवर गुरुवारी दुपारीही घटना घडली. रक्ताने थपथपलेल्या कपड्यासह त्यास जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची मान ३ इंच लांब चिरली. १ इंच खोल जखम झाली. डाव्या हाताची दोन बोटेही कापल्या गेली. त्या जखमेतून ४० एम. एल.रक्त सांडले. प्लास्टिक सर्जरी करून डॉक्टरांनी त्याचा जीव वाचविला. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा ‘नायलॉन मांजा’ची घातकता सर्वांसमोर आली.
ज्ञानेश्वर शिवाजी धोपटे असे त्या युवकाचे नाव आहे. तो आळंद (ता.फुलंब्री) येथील मूळ रहिवासी आहे. तो औरंगाबादेत मित्रांसोबत रूम करून राहत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. जळगावरोडवर सेंट जॉन इंग्लिश स्कूलच्या समोरील रस्त्यावर गुरुवारी दुपारी तो दुचाकीवरून जात असताना अचानक नायलॉन मांजा त्याच्या मानेला चिरून गेला, मांजापासून मान वाचविण्यासाठी त्याने डावा हात पुढे केला तर दोन बोटेही कापली. अशा अवस्थेत त्याने दुचाकी बाजूला घेतली. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी गाड्या बाजूला ठेवून त्यास जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार करून सर्वप्रथम रक्तस्त्राव थांबविला. आकाशवाणी चौकातील हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्या मानेवर प्लास्टिक सर्जरी केली. उपचाराला आणखी थोडा वेळ लागला असता तर त्या युवकाचा प्राणही गेला असता.
पतंग उडविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
ऑपरेशन करताना मानेला सर्जरी ब्लेडने ३ इंच लांब, १ इंच खोल कापण्यासाठी डॉक्टरांना ४ ते ५ मिनिटे लागतात. पण नायलॉन मांजाने डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत गळा कापल्या गेला. यावरून मांजा किती घातक आहे हे कळते. पतंग उडविणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा. ते अल्पवयीन असतील तर त्यांच्या आई-वडिलांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. जेणेकरून यापुढे कोणाचा गळा चिरू नये.
- डॉ. विलास ढाकरे
हात जोडून सांगतो नायलॉन मांजाने पतंग उडवू नका
नायलॉन मांजामुळे मुलाचा गळा कापल्या गेला पण डॉक्टरांमुळे त्याला जीवदान मिळाले. पतंग उडविणाऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो की, नायलॉन मांजाने पतंग उडवू नका. साध्या दोऱ्याने उडवा. पतंग विकत घेता येतो, पण गेलेला जीव परत येत नाही.
- शिवाजी धोपटे, ज्ञानेश्वर धोपटेचे वडील
प्लास्टिक सर्जरी केली
ज्ञानेश्वर धोपटेचा नायलॉन मांजाने गळा चिरला होता. बराच रक्तस्त्राव झाला होता. डॉ. अमित पाटील यांनी त्याच्या मानेवर प्लास्टिक सर्जरी केली. आता त्याची तब्येत ठीक आहे. नायलॉन मांजामुळे अधूनमधून गळा चिरणारे रुग्ण कोणत्या ना कोणत्या रुग्णालयात दाखल होत असतात. नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई व्हावी.
- डॉ. शोहब हासमी