'एकदा ‘सॉरी’ म्हण, सगळे विसरून जातो'; तिने नकार देताच झाले औरंगाबादमधील जळीतकांड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 01:27 PM2022-11-24T13:27:33+5:302022-11-24T13:28:12+5:30

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे

'Say 'sorry' once, I will forget all'; As soon as she refused boy burnt himself and hugs girl friend in Aurangabad | 'एकदा ‘सॉरी’ म्हण, सगळे विसरून जातो'; तिने नकार देताच झाले औरंगाबादमधील जळीतकांड

'एकदा ‘सॉरी’ म्हण, सगळे विसरून जातो'; तिने नकार देताच झाले औरंगाबादमधील जळीतकांड

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांच्या वादात एका प्राध्यापकाने मध्यस्थी करीत दोघांचे १२ नोव्हेंबर रोजी समुपदेशन केले. तरुणाने तरुणीला यापुढे त्रास देणार नाही, असा शब्द दिला. मात्र, त्यासाठी एकदा माझी फसवणूक केल्याबद्दल ‘सॉरी’ म्हणावे अशी अट घातली. त्यावर तरुणीने आपण कोणाचीही फसवणूक केलेली नसल्यामुळे ‘सॉरी’ म्हणण्यास नकार दिला. वाद विकोपाला गेल्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी एका तात्कालिक कारणामुळे त्याचे पर्यवसान जळीतकांडात झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी गजानन मुंडे याने जाळून घेत सहकारी संशोधक विद्यार्थिनीला कवटाळल्याचा प्रकार २१ नोव्हेंबर रोजी घडला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. बुधवारी तपास पथकाने पीडित तरुणीकडील पेन ड्राइव्ह, व्हॉट्सॲप चॅट जप्त केले. त्याशिवाय विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागप्रमुख, दोघांच्या पीएच.डी.चे मार्गदर्शक, विज्ञान संस्थेतील प्राध्यापक, तरुणासह तरुणीचे मित्र-मैत्रीण यांचे जबाब नोंदवले. त्यातील एका प्राध्यापकाच्या जबाबानुसार मृत तरुणाने त्यांच्याकडे पीडित तरुणीने फसवणूक केल्याविषयी तक्रार केली होती. प्राध्यापकाने दोघांना १२ नोव्हेंबर रोजी समोरासमोर बसवून समुपदेशन केले. तरुणाने एकदा ‘सॉरी’ म्हणण्याची अट घातली. मात्र तरुणीने ती मान्य केली नाही. याविषयीचे व्हॉट्सॲप मेसेजही तरुणाने संबंधित प्राध्यापकाला पाठविले होते.

हे ठरले तात्कालिक कारण
पीडित तरुणीने १७ नोव्हेंबर रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. ठाण्यात दिलेला तक्रार अर्ज तरुणीने प्राणिशास्त्र विभागप्रमुखांनाही कुरिअरद्वारे पाठवला. विभागप्रमुखांनी २१ नोव्हेंबर रोजी तरुणाला विभागात बोलावून घेतले. तरुणीच्या तक्रारीमुळे तुझी पीएच.डी.ची नोंदणी रद्द करण्यात येईल, त्याविषयीचे तुझे स्पष्टीकरण कुलसचिवांकडे दे, असे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या गजाननने विभागातून थेट वसतिगृहातील खोली गाठत त्या ठिकाणी फळ्यावर सुसाइड नोट लिहिली. त्यानंतर विज्ञान संस्थेत ही घटना घडली.

१५ सप्टेंबरला आत्महत्येचा प्रयत्न
मृत गजानन याने १५ सप्टेंबर रोजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात अंगावर पेट्रोल ओतून घेतले होते. पीडितेच्या हातात काडीपेटी देत आग लावण्यास सांगितले होते. तेव्हा तरुणी घटनास्थळावरून निघून गेली. त्यानंतर तिने मृताच्या वडिलांनाही मुलाला समजावून सांगा, असे फोनवरून सांगितले होते. याविषयीचे रेकॉर्डिंगही पोलिसांना प्राप्त झाले आहे. इतरही दोन वेळा तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तपासात पुढे आले.

Web Title: 'Say 'sorry' once, I will forget all'; As soon as she refused boy burnt himself and hugs girl friend in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.