म्हणे, आज पाणी येणार नाही; आले मनपा कर्मचाऱ्यांच्या मना, तेथे कोणाचे चालेना !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 05:09 PM2022-04-30T17:09:14+5:302022-04-30T17:09:38+5:30
सकाळी सात वाजेपर्यंत पाणी आले नाही. नागरिकांनी टाकीवर जाऊन विचारणा केली, तेव्हा एक दिवसाने पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. कारण विचारले, तर ते म्हणतात, माहीत नाही.
औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठा किमान चार दिवसाआड तरी व्हावा, या दृष्टीने प्रयत्न करा, असे आदेश प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले होते. याचा आधार घेत पाणीपुरवठा विभागातील ‘तज्ज्ञ’ कर्मचाऱ्यांनी शहरातील अनेक भागांचा पाणीपुुरवठाच विस्कळीत करून टाकला आहे. ज्युब्ली पार्क पाण्याच्या टाकीवरील पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला. विशेष बाब म्हणजे, हा बदल करताना कोणालाही कल्पना दिली नाही. कर्मचाऱ्यांचा या प्रतापामुळे गुरुवारपासून तब्बल दीड लाखाहून अधिक नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
ज्युब्ली पार्क पाण्याच्या टाकीवरून पहाटे ४.३० पासून पाणी वितरणाला सुरुवात होते. शुक्रवारी पहाटे भडकलगेट, नूर कॉलनी, टाऊन हॉल, आदी वसाहतींना पाणी देण्यात येणार होते. नागरिक पहाटेपासून पाण्याची वाट पाहत होते. सकाळी सात वाजेपर्यंत पाणी आले नाही. नागरिकांनी टाकीवर जाऊन विचारणा केली, तेव्हा एक दिवसाने पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. कारण विचारले, तर ते म्हणतात, माहीत नाही. वरिष्ठांनी सांगितल्यामुळे आम्ही गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू केली. गुरुवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते, त्यांना पाणी दिले नाही. त्यांना शुक्रवारी पाणी देण्यात आले. नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, आदी वसाहतींना शुक्रवारी पाणीपुरवठा करायचा होता. आता त्यांना शनिवारी किंवा रविवारी पाणी येईल, असे सांगण्यात आले. शनिवारी (ता. ३०) फारोळा येथे अत्यावश्यक दुरुस्तीसाठी दोन तासांचा शटडाऊन घेण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला. त्यामुळे या काळात शहराच्या दोन्ही पाणीपुरवठा योजना बंद राहणार आहेत. शहरातील संपूर्ण पाणी वितरणावर याचा परिणाम होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे शहराच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहेत. त्यात भर म्हणून शनिवारी वीज वितरण कंपनी दोन तास शटडाऊन घेणार आहे. फारोळा येथील महापालिकेच्या नवीन व जुन्या पंपगृहाला चितेगाव येथील २२० केव्ही उपक्रेंद्रातून एक्सप्रेस फिडरव्दारे वीज पुरवठा केला जातो. या उपकेंद्रात रोहित्राला जोडणी करण्यात आलेल्या करंट ट्रान्स्फॉर्मरमधून (सीटी) ऑइल लिकेज होत आहे. त्यामुळे करंट व व्होल्टेजमध्ये अनियमितता येऊन मोठा बिघाड होण्याचा धोका आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी १२ ते दुपारी २ या वेळेत खंडणकाळ घेण्यात येईल, असे वीज कंपनीने महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे या काळात ५६ एमएलडी व १०० या दोन्ही योजनेचा पाणी उपसा बंद राहणार आहे. परिणामी शनिवारी ज्या भागात पाणीपुरवठा असेल, तेथील वेळापत्रक कोलमडणार आहे. नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
काय म्हणाले कार्यकारी अभियंता...
पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला या संदर्भात मला काहीच माहिती नाही. कनिष्ठ अभियंता अरुण मोरे यांना या संदर्भात अधिक माहिती असेल. त्यांना विचारून माहिती देतो.
- हेमंत कोल्हे, कार्यकारी अभियंता.
कनिष्ठ अभियंता यांचे मत वेगळेच
अनेक वसाहतींना आठ ते नऊ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत होता. त्यांचा पाणीपुरवठा एक दिवसाने कमी करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी नवीन वेळापत्रक ठरविण्यात आले. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यामुळे काही वसाहतींचे पाणी एक दिवस पुढे ढकलले. याची पूर्वसूचना नागरिकांना देणे आवश्यक होते; पण आमचे चुकले.
- अरुण मोरे, कनिष्ठ अभियंता.