सायाळच्या कारनाम्याने कारखान्यास लाखोंचे नुकसान; काटयांवरुन शोध लागला, वनात केले मुक्त
By साहेबराव हिवराळे | Published: November 17, 2023 06:58 PM2023-11-17T18:58:11+5:302023-11-17T18:59:20+5:30
शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीस बसला लाखोंचा फटका
छत्रपती संभाजीनगर: शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत इंटरनेट केबल तोडून लाखों रुपयांचे नुकसान करणारे सायाळ प्राणीमित्राच्या टिमने शोधून काढले. त्यानंतर त्याला वनक्षेत्रात सोडून जीवनदान देण्यात आले.
वनस्पतींचे कोंब, कंदमुळ, फळे, पालेभाज्या खाणारा सायाळ क्वचितप्रसंगी मांसाहार पण करताना दिसून आले आहे. परंतु, याच सायाळमुळे शेंद्रा येथील एका कंपनीस लाखोंचे नुकसान झाले आहे. झाले असे की, या कंपनीतील इंटरनेट अचानक ठप्प झाले. शोध घेतला असता वायर कुरतरडलेल्या ठिकाणी कर्मचारी अब्रार अहमद कुरेशी यांना सायाळचे काटे आढळून आले. याची माहिती प्राणी मित्र नितीन जाधव यांना देण्यात आली. त्यांनी कंपनीत येत शोध घेऊन सायाळ ताब्यात घेतले. त्यानंतर मानद वन्यजीवरक्षक डाॅ.किशोर पाठक आणि वनरक्षक अशोक भिमराव साबळे यांच्या समक्ष सायाळला सुरक्षित वनक्षेत्राच्या आधिवासात सायाळला सोडून देण्यात आले.
अधिवास नष्ट झाल्याने वन्यजीव धोक्यात
वाढते औद्योगिकरण,मोठे महामार्ग निर्मिती,डोंगर-दऱ्या पोखरण, माळरान नष्ट होऊन मानवी हस्तक्षेप वाढल्याने अनेक प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.अधिवास नष्ट झाल्याने संख्या कमी झाली असून अन्न शोधण्यासाठी हे प्राणी मानवी वस्त्या,कारखाने येथे दिसून येतात, अशी माहिती मानद वन्य जीवरक्षक डॉ.किशोर पाठक यांनी दिली.
सायाळच्या कारनाम्याने शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यास लाखोंचे नुकसान; काटयांवरुन शोध लागला, वनात केले मुक्त pic.twitter.com/Am22BqgVng
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) November 17, 2023
सायाळचे वैशिष्ट्य
साळिंदर किंवा सायाळ याला इंग्रजीत पोर्कुपाईन असे म्हणतात. हा भारतात समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय परिसरात दिसणारा सस्तन प्राणी आहे. शेतजमिनी,वने,डोंगराळ,खडकाळ प्रदेशात सर्वत्र आढळतो.सायाळ हा कृतकजन्य म्हणजेच घुशीच्या कुळातला प्राणी आहे. याचे दात, पायाचे पंजे आणि नखे हे वैशिष्ट्यपूर्ण असतात. जेणे करून या प्राण्याला जमीन खोदता येते तसेच कुरतडता येते. जमिनीत बिळ करून साळिंदर त्यात राहतो. तपकिरी काळसर रंग असून पाठीवरचे केस हे कडक होवून काट्यासारखे दिसतात. हे ३० सेमीपर्यंत वाढतात.शत्रूपासून बचाव करण्यासाठी हे काटे वापरात येतात.सायाळ शत्रू अंगावर आल्यास त्याच्याकडे पाठ करून काटे फुलावतो. त्यामुळे काटे शत्रूच्या शरीरात घुसतात, अशा रीतीने तो स्वतःचा बचाव करतो.