स.भु. संस्था जाणार भांडवलदारांच्या घशात
By Admin | Published: June 30, 2017 12:11 AM2017-06-30T00:11:07+5:302017-06-30T00:18:11+5:30
औरंगाबाद : शतकापूर्वी स्थापन झालेली सरस्वती भुवन शिक्षण संस्था गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था राहिली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शतकापूर्वी स्थापन झालेली सरस्वती भुवन शिक्षण संस्था गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था राहिली नाही. बड्या भांडवलदारांना सभासद करत त्यांच्याच घशात संस्था घालण्याचे मोठे षड्यंत्र रचण्यात आले असल्याचा खळबळजनक आरोप संस्थेचे माजी सरचिटणीस डॉ. अशोक भालेराव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. स्वातंत्र्यसैनिक, धर्मनिरपेक्षवादी आणि समाजवादी विचारांच्या लोकांनी स्थापन केलेली संस्था वाचविण्यासाठी ‘सरस्वती भुवन बचाव चळवळ’ उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.
स. भु. संस्थेच्या जालना जिल्ह्यातील दोन एकर जमीन विक्री प्रकरणात अपहार केल्याच्या आरोपावरून माजी सरचिटणीस डॉ. अशोक भालेराव यांचे सदस्यत्व दहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा ठराव संस्थेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. याविषयी भूमिका मांडण्यासाठी डॉ. अशोक भालेराव यांनी गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी प्रा. सुरेश कुलकर्णी, डॉ. सुहास बर्दापूरकर आणि डॉ. किशोर चपळगावकर उपस्थित होते. जून महिन्यापर्यंत संस्थेचे ५० ते ६० सदस्य होते. या महिन्यात २६ नवीन सदस्यांची भर घालण्यात आली. याला संस्था अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर यांनी विरोध केला होता. विरोधाचे पत्रही देण्यात आले; मात्र त्यांच्या गैरहजेरीत नवीन सदस्यांना मान्यता देण्यात आली. यातील बहुतांश सदस्य उद्योग जगताशी संबंधित आहेत. मुस्लिम, दलित किंवा मागास समाजातील एकही सदस्य नाही. घराणेशाहीला नावे ठेवणाऱ्यांनी नात्यागोत्यातील लोकांना सदस्यत्व बहाल केल्याचा आरोप डॉ. अशोक भालेराव यांनी केला. मराठी भाषेत शिक्षण देण्याच्या उद्देशाने काढलेल्या संस्थेत इंग्रजी माध्यमासाठी शाळा काढण्यात आली. ही शाळा गोरगरिबांसाठी नव्हे, तर धनदांडग्यांसाठी उघडण्यात येत आहे. या सर्व अंमलबजावणीत सर्वांत मोठा अडसर माझा होता. यामुळेच चौकशी समिती नेमून नवीन सदस्यांच्या बळावर मला निलंबित करण्यात आले.
याला कायदेशीरपणे न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.