एसबीओए शाळेने गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले; शिक्षण विभाग गुन्हा दाखल करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 08:17 PM2024-08-28T20:17:16+5:302024-08-28T20:18:09+5:30

पालकांची शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांकडे प्रवेशासाठी विनवणी

SBOA school denied admission to poor students; Instructions for filing a case of education department | एसबीओए शाळेने गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले; शिक्षण विभाग गुन्हा दाखल करणार

एसबीओए शाळेने गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले; शिक्षण विभाग गुन्हा दाखल करणार

छत्रपती संभाजीनगर : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिक दुर्बल घटकातील ३० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एसबीओए पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश देण्यात आले नाहीत. याविषयी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही पाळण्यात आले नाहीत. यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांसह शाळा व्यवस्थापनालाही विनंत्या केल्या. मात्र, काहीही तोडगा निघाला नसल्याचे स्पष्ट झाले.

आरईटी प्रवेश प्रक्रियेला दोन महिने विलंब झालेला आहे. मागील काही दिवसांपासून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना नियमानुसार अलाॅटमेंट देण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्हाभरात आरटीईचे प्रवेश देण्यात येत आहेत. मात्र, जळगाव रस्त्यावरील एसबीओए पब्लिक शाळेत आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवसांपर्यंत प्रवेश देण्यात आलेले नाहीत. त्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांची सोमवारी भेट घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार चव्हाण यांनी एसबीओएच्या मुख्याध्यापकांना कार्यालयात बोलावून घेत संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या सूचना दिल्या. त्याशिवाय आरटीई कायद्यानुसार शाळेच्या विरोधात कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्याविषयीचे स्वतंत्र लेखी आदेशही काढण्यात आले.

त्यानंतरही शाळा व्यवस्थापनाने मंगळवारी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले नाहीत. माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही शाळेच्या व्यवस्थापनाची भेट घेत चर्चा केली. मात्र, शाळा व्यवस्थापनाने आरटीई विद्यार्थ्यांच्या शुल्काचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर २ सप्टेंबर रोजी निर्णय होण्याची शक्यता असल्यामुळे तोपर्यंत आम्ही प्रवेश देणार नसल्याचे शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या शेवटच्या दिवसांपर्यंतही विद्यार्थ्यांना प्रवेश दिले नाहीत. त्यामुळे संबंधितांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे.

मुख्याध्यापक व शाळेच्या विरोधात गुन्हे नोंदवा
जि.प.च्या प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून एसबीओए पब्लिक स्कूलने आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेले नाहीत. त्यामुळे संंबंधित शाळेच्या मुख्याध्यापक आणि शाळेच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवावा, असे पत्राद्वारे कळविले आहे.

याचिका न्यायालयात प्रलंबित
शाळेत आरटीईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेले नाहीत. त्याविषयीची याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्या याचिकेचा निर्णय आल्यानंतर प्रवेशावर निर्णय घेतला जाईल.
-शुभदा पुरंदरे, मुख्याध्यापक, एसबीओए पब्लिक स्कूल.

Web Title: SBOA school denied admission to poor students; Instructions for filing a case of education department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.