'भूमी अभिलेख'मध्ये घोटाळा; बोगस चालान लावलेल्या शेकडो जमिनींची मोजणीही अवैध!

By मुजीब देवणीकर | Published: July 3, 2024 11:15 AM2024-07-03T11:15:27+5:302024-07-03T11:20:02+5:30

‘लोकमत’च्या वृत्ताने भूमी अभिलेख विभागात भूकंपजन्य स्थिती

Scam in Land Records Department of Chhatrapati Sambhajinagar; Counting hundreds of bogus invoiced lands is illegal! | 'भूमी अभिलेख'मध्ये घोटाळा; बोगस चालान लावलेल्या शेकडो जमिनींची मोजणीही अवैध!

'भूमी अभिलेख'मध्ये घोटाळा; बोगस चालान लावलेल्या शेकडो जमिनींची मोजणीही अवैध!

छत्रपती संभाजीनगर : भूमी अभिलेख विभागात चार वर्षांपासून जमीन मोजणीचे बोगस चालान वापरून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचे वृत्त रविवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केले. त्यामुळे विभागात ‘हडकंप’ झाला. बोगस चालान लावून मोजण्यात आलेल्या जमिनींच्या वैधतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. या सर्व फाइली रद्दबातल ठरविण्यात येणार आहेत का, असा प्रश्न या विभागातील तज्ज्ञांनी उपस्थित केला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागात मागील चार वर्षांपासून बेकायदेशीरपणे जमीन मोजणी करून देत असल्याचे उघडकीस आले. जमीन मोजणीतून शासनाला मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मिळून ताव मारल्याचे उघड झाले. एवढे खळबळजनक प्रकरण उघडकीस आल्यानंतरही विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते गांभिर्याने न घेता थातूरमातूर कारवाई केली. घोटाळ्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना साधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे बँकेत पैसे भरल्याचे भासवून खोटे सही-शिक्के वापरण्यात आलेल्या चालानची चार वर्षांपासूनची चौकशी न करता जानेवारी २०२४ पासून सुरू केली. अवघ्या तीन ते चार महिन्यांच्या फाइली तपासण्यात आल्या. बँकेत ऑनलाइन पैसे न भरलेल्या दीडशे ते दोनशे फाइली निदर्शनास आल्या. तेवढ्याच फाइलींचे नंतर पैसेही भरून घेण्यात आले, म्हणजे एखाद्या जमिनीची माेजणी तीन वर्षांपूर्वी झाली, तर त्याचे पैसे घोटाळ्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांनी दीड महिन्यापूर्वी भरले तर कसे चालेल? उपअधीक्षक, मुख्यालय सहायक, छाननी लिपिक आदी कर्मचारी कार्यालयात जेव्हापासून कार्यरत आहेत, तेव्हापासून सर्वच फाइलींची शहानिशा करायला हवी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

जमीन मोजणी वैध की अवैध ?
भूमी अभिलेख विभागात जमीन मोजणीच्या चालानवर बोगस सही-शिक्के वापरून अनेक नागरिकांना मोजणी करून दिली. ही मोजणी वैध की अवैध, असा प्रश्न या विभागातील काही निवृत्त अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर उपस्थित केला, कारण जमीन मोजणीच्या कागदपत्रांचा वापर न्यायालयात, विविध शासकीय ठिकाणी करण्यात येतो.

अधिकाऱ्यांना थेट पैसे देणारे कोण ?
ज्या नागरिकांनी जमीन मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना थेट पैसे दिले, त्यांच्याच फाइलींमध्ये घोळ झाला आहे. ज्यांनी चालान बँकेत जाऊन किंवा ऑनलाइन स्वत:च्या अकाउंटमधून भरले, त्यांचा काहीच प्रश्न नाही.

Web Title: Scam in Land Records Department of Chhatrapati Sambhajinagar; Counting hundreds of bogus invoiced lands is illegal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.