बारावी परीक्षेत घोटाळा! ‘कर्सिव्ह’ रायटिंगने अपूर्ण उत्तरे केली पूर्ण, उत्तरपत्रिकेत ‘फाॅर्म्युला’ लेखन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 07:42 PM2023-05-11T19:42:43+5:302023-05-11T19:43:16+5:30
एक-एक विद्यार्थी चौकशीसाठी आतमध्ये जात होता. त्यावेळी पालकांचा जीव टांगणीला लागत होता.
छत्रपती संभाजीनगर : बारावी परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाच्या काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांत दुसऱ्याचेच हस्ताक्षर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मंगळवारपासून याप्रकरणी शिक्षण मंडळाने चौकशी सुरू केली असून, बुधवारी ७४ पैकी ७१ विद्यार्थी चौकशीला हजर राहिले. यात काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत ‘कर्सिव्ह’ रायटिंगने अपूर्ण उत्तरे पूर्ण करण्यात आल्याचे आणि काहींच्या पेपरमध्ये ‘फाॅर्म्युला’ लेखन आढळले आहे.
परीक्षेनंतर कस्टडीतून मॉडरेटरांकडे उत्तरपत्रिका तपासणीसाठी दिल्या जातात. त्यांच्याकडून मुख्याध्यापकांमार्फत तपासनीसांकडे जाते. नंतर पुन्हा मॉडरेटरकडे उत्तरपत्रिका येतात. तेव्हा माॅडरेटर उत्तरपत्रिकांची पडताळणी करतात. त्या दरम्यान हस्ताक्षर बदल झाल्याचा प्रकार निदर्शनाला आला आणि ही बाब शिक्षण मंडळाला कळविण्यात आली. मग विद्यार्थ्यांची चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीसाठी बोलावलेल्या विद्यार्थ्यांसोबत पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. एक-एक विद्यार्थी चौकशीसाठी आतमध्ये जात होता. त्यावेळी पालकांचा जीव टांगणीला लागत होता. मुलाला तर पेपर सोपा गेला होता, मग हा प्रकार कसा झाला, असा प्रश्न पालकांना पडला.
कोणी कविता लिहिली, कोणी उत्तरपत्रिका फाडली,
५०० विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात हस्ताक्षर बदलाबरोबरच काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत कविता लिहिलेली तसेच इतर मजकूर होता तर काहींची उत्तरपत्रिका फाडलेली होती. अशा एकूण ५०० विद्यार्थ्यांची १३ तारखेपर्यंत चौकशी होईल.
प्रत्येक प्रश्नाला विद्यार्थ्यांचे उत्तर ‘नाही’
चौकशीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. त्यात ‘तुम्हाला आरोप मान्य आहे का’, ‘गुन्हा मान्य आहे का’, ‘उत्तरपत्रिकेतील अक्षर तुमचेच आहे का’, अशा प्रश्नांची विचारणा करण्यात येत आहे. त्यावर ‘नाही’ असेच विद्यार्थी सांगत आहेत. उत्तरपत्रिकेत ‘कर्सिव्ह’ रायटिंगने अपूर्ण उत्तरे कोणी तरी पूर्ण केल्याचे, उत्तरपत्रिकेच्या मध्यभागी, शेवटच्या पानावर ‘फाॅर्म्युला’ लेखन केल्याचे आढळले, असे विद्यार्थ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उत्तराशिवाय इतर काही लिहिले तर चौकशी
उत्तरपत्रिकेत उत्तराशिवाय इतर काहीही लिहिले, पेपर फाडला तर विद्यार्थ्यांची चौकशी केली जाते. ही नियमित प्रक्रिया आहे. १३ तारखेपर्यंत ही चौकशी चालेल. सुमारे ५०० विद्यार्थ्यांची चौकशी होईल.
- व्ही. व्ही. जोशी, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ