करोडोचा घोटाळा उघडकीस आणला पण मुख्यमंत्र्यांच्या गोटातील आमदारांसोबत जुळले नाही, मनपा प्रशासकांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 12:47 PM2023-05-03T12:47:16+5:302023-05-03T12:48:09+5:30
नोव्हेंबर २०२२ पासून काही लोकप्रतिनिधींनी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या बदलीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. सहा महिन्यांच्या प्रयत्नांनंतर राजकीय मंडळींना मंगळवारी यश आले.
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या प्रशासकपदी शासनाने मंगळवारी वस्तू व सेवाकर सहआयुक्त जी. श्रीकांत यांची नेमणूक केली. २ ऑगस्ट २०२२ रोजी प्रशासक म्हणून रूजू झालेले डॉ. अभिजीत चौधरी यांना शहरातच जी. श्रीकांत यांच्या जागेवर नेमणूक देण्यात आली. डॉ. चौधरी यांच्या बदलीसाठी मागील सहा महिन्यांपासून राजकीय मंडळींकडून प्रयत्न करण्यात येत होते, हे विशेष.
महापालिकेत २०२० पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. कोरोना संसर्गात उल्लेखनीय कामगिरी करणारे तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांची ऑगस्ट २०२२ मध्ये बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची नेमणूक केली होती. चौधरी यांनी पदभार घेतल्यानंतर महापालिकेच्या कामकाजात आमूलाग्र बदल सुरू केले. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी मेटाकुटीला आले होते. अनेकदा ते अधिकाऱ्यांशी न बोलता थेट कर्मचाऱ्यांशी संवाद साधत. पंतप्रधान आवास योजनेतील कंत्राटदाराची चोरी त्यांनी पकडली. त्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची ईडी चौकशी सुरू झाली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते. जी-२० मध्ये शहर सौंदर्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय आमदारांसोबत त्यांचे ट्युनिंग जुळले नाही. नोव्हेंबर २०२२ पासून काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या बदलीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. सहा महिन्यांच्या प्रयत्नांनंतर राजकीय मंडळींना मंगळवारी यश आले. विशेष म्हणजे डॉ. चौधरी हे सध्या ग्रीसमध्ये खासगी दौऱ्यावर आहेत.
लातूर जिल्हाधिकारी, जीएसटीत उल्लेखनीय काम
जी. श्रीकांत २००९ बॅचचे आयएस अधिकारी असून, त्यांनी अलीकडेच लातूरला जिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले. त्यानंतर शासनाने त्यांना जीएसटी विभागात सहआयुक्त म्हणून नेमले. या ठिकाणीही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. जीएसटी विभागाने व्यापाऱ्यांसाठी राबवलेली अभय योजना, कर भरण्यासाठी केलेली सुलभ प्रक्रिया, वेळेवर परतावा असे अनेक उपक्रम यशस्विरीत्या राबविले. करसंकलनात भरीव वाढ केल्याबद्दल देशात अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा टीआयओएलचा ज्युरी ॲवाॅर्ड जी. श्रीकांत यांनी आपल्या विभागाला मिळवून दिला.