शेअर मार्केटच्या नावाखाली करोडोंचा घोळ; आरोपी पळाला थायलंडला, गुंतवणूकदार तणावात

By सुमित डोळे | Published: December 12, 2023 12:46 PM2023-12-12T12:46:08+5:302023-12-12T12:46:28+5:30

पोलिसांचा तपास सुरू करण्यापूर्वीच मुख्य आरोपी पत्नीला देशात अन्यत्र लपवून थायलंडला पसार झाला होता.

scam of crores in the name of share market; Accused fled to Thailand, investors in tension | शेअर मार्केटच्या नावाखाली करोडोंचा घोळ; आरोपी पळाला थायलंडला, गुंतवणूकदार तणावात

शेअर मार्केटच्या नावाखाली करोडोंचा घोळ; आरोपी पळाला थायलंडला, गुंतवणूकदार तणावात

छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केटच्या नावाखाली आभा इन्व्हेस्टमेंट ॲण्ड लॅण्ड डेव्हलपर्सद्वारे कोट्यवधींचा घोटाळा करणारा पंकज शिवाजी चंदनशिव हा थायलंडला पळून गेला आहे. ४ ऑक्टोबर रोजी यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांचा तपास सुरू करण्यापूर्वीच पंकज पत्नीला देशात अन्यत्र लपवून थायलंडला पसार झाला होता. एकाच वेळी त्याने १०, १४ कोटींची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

चंदनशिव शेअर्स ट्रेडिंग फॉरेक्स क्रिप्टो करन्सी कमोडिटीज ट्रेडिंगचा व्यवसाय करत होता. प्रतिमहिना ७ टक्के परतावा देण्याची हमी तो देत होता. त्याच्या विरोधात दाखल प्राथमिक तक्रारीत ५२ गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून दोन कोटी ३० लाखांचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जवळपास ६० पेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्या. त्यामुळे तेव्हाच हा घोटाळा ६० कोटींच्या पुढे आकडा जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त धनंजय पाटील याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

बॉण्डवर करार, नंतर ज्ञानोबा पतसंस्थेच्या एफडी दिल्या
चंदनशिवने २०२१ मध्ये या फर्मची स्थापना केली. प्रत्येक गुंतवणूकदारासोबत १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर अकरा महिन्यांचे सामंजस्य करार केले. संचालक मंडळावर त्याची पत्नी प्रियंका (रा. जयभवानीनगर), शिवाजी रोडे (रा. हर्सूल सावंगी), सोमीनाथ चंदनशिव, सोमीनाथ नरवडे हे असल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले. आभामधील सर्व पैसे पंकजने शेअर मार्केटमध्ये गुंतवले. पोलिसांना प्राप्त रेकॉर्डनुसार, काही खात्यांमध्ये त्याने एकाच वेळी १० कोटी, १४ कोटी, ४ कोटी गुंतवले. गुंतवणूकदारांनी पैशांचा तगादा लावल्यानंतर त्याने ज्ञानोबा अर्बन क्रेडिट सोसायटीत तुमची मुद्दल व परतावा मिळून एफडी करतो, असे आमिष दाखवले. एफडीचा एक कागद त्यांना सुपुर्द केला. मात्र, त्यातही आता काहीच पैसे नसून रेकॉर्ड उपलब्ध नसल्याने तपासात अडचणी येत आहे.

एका आरोपीचे तपासात सहकार्य

आरोपींमधील नरवडे सहकार्य करत असल्याने कलम ४१ नुसार नोटीस देऊन त्याला चौकशीसाठी वारंवार बाेलावले जात होते. मात्र, रविवारी गुंतवणूकदारांनी त्याला घरातून पकडून मारहाण करून पोलिस आयुक्तालयात नेले. उपचारानंतर सोमवारी चौकशी करून पोलिसांनी त्याला नातेवाइकांच्या ताब्यात दिले. नरवडे हा केवळ आभा इन्व्हेस्टमेंट ॲण्ड लॅण्ड डेव्हलपर्सच्या बोर्डावर असून, ज्ञानोबावर त्याचे नाव नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

Web Title: scam of crores in the name of share market; Accused fled to Thailand, investors in tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.