घोटाळेबाज हर्षकुमारने क्रीडा संकुलास कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीच्या मॅनेजरलाही दिले ८० लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 11:23 IST2024-12-31T11:23:16+5:302024-12-31T11:23:35+5:30
हर्षकुमारच्या पैशांची मुख्य वाटेकरी असलेली अर्पिता वाडकर (२१) हिच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे

घोटाळेबाज हर्षकुमारने क्रीडा संकुलास कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीच्या मॅनेजरलाही दिले ८० लाख
छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुलास कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या ‘वेव मल्टीसर्व्हिसेस’च्या व्यवस्थापकाचे हात बरबटलेले असल्याचे आता समोर आले आहे. घोटाळ्याचा प्रमुख आरोपी हर्षकुमार क्षीरसागर (२१) याने मल्टिसर्व्हिसेसचा नागेश श्रीपाद डोंगरे (३५, रा. उल्कानगरी) याला ८० लाख रुपये दिल्याचे सबळ पुरावे पोलिसांना मिळताच नागेशला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.
आर्थिक गुन्हे शाखेकडून या विभागीय क्रीडा संकुलाला पूर्वी दिशा फॅसिलिटीज प्रा. ली. तर्फे कर्मचारी पुरवले जात होते. २०२३ मध्ये डोंगरेच्या वेळ मल्टी सर्व्हिसेसमार्फत कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुरू करण्यात आली. विभागाचा कोट्यवधी रुपयांचा निधी लंपास केलेल्या हर्षकुमारने उच्चभ्रू व आलिशान जीवनशैलीवर पैसे खर्च केले. सहकाऱ्यांसह मैत्रिणी व आता त्याची नियुक्ती केलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकाला देखील त्यांनी ८० लाख रुपये दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर उपनिरीक्षक अशोक अवचार यांच्या पथकाने नागेशला तत्काळ अटक केली.
अर्पिताच्याही पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ
हर्षकुमारच्या पैशांची मुख्य वाटेकरी असलेली अर्पिता वाडकर (२१) हिच्या पोलिस कोठडीची सोमवारी मदत संपल्याने नागेश व अर्पिताला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने नागेशला चार, तर अर्पितालाही चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यापूर्वी अटक केलेले यशोदा शेट्टी, तिचा पती जीवन कार्याप्पा विंदडा हे अद्यापही पोलिस कोठडीत आहेत.
हर्षकुमारची मुंबईमध्ये देखील गुंतवणूक
अर्पिता राहत असलेल्या नवी मुंबईच्या परिसरात देखील हर्षकुमारने कोट्यवधी रुपयांचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. त्याशिवाय शेंद्रा रोडवरील दोन गाळ्यांपैकी एक गाळा अर्पिताच्या नावावर केला आहे. त्याशिवाय कोट्यवधी रुपयांचे दागिने देखील अर्पिताला त्याने दिले.
पसार होण्यापूर्वी मामाची भेट
हर्षकुमारने बीएमडब्ल्यू, महिंद्राच्या दोन कार, दुचाकी व्यतिरिक्त स्कोडा कंपनीचीही कार खरेदी केली होती. गुन्हा दाखल होताच हर्षकुमारने मालेगावच्या मामाची भेट घेऊन स्कोडा कार त्याच्याकडे ठेवली. त्यानंतर महिंद्राची कार घेऊन पसार झाला. पोलिसांनी रविवारी मालेगाव येथून ही कार जप्त केली.