रेल्वेतल्या तक्रारीसाठी क्यूआर कोड स्कॅन करा; गुन्ह्यात आता २ तासांत होणार एफआयआर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 04:22 PM2024-01-11T16:22:02+5:302024-01-11T16:22:21+5:30
‘मिशन ट्रस्टेड पोलिसिंग’; रेल्वे स्थानक, लोहमार्ग पोलिस ठाण्यांवर क्यूआर कोड लावण्यात आले आहेत
छत्रपती संभाजीनगर : रेल्वेमध्ये घडलेल्या कुठल्याही गुन्ह्यात तक्रारदार लोहमार्ग पोलिस ठाण्यात आल्यानंतर आता दोन तासांमध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे. बेपत्ता प्रकरणात तासाभरात कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यात लोहमार्ग पोलिसांच्या प्रतिसादाबाबत तक्रारदार, प्रवासी समाधानी आहेत की नाहीत, याची आता थेट लोहमार्ग पोलिस महासंचालक दखल घेणार आहेत. त्यासाठी रेल्वे स्थानक, लोहमार्ग पोलिस ठाण्यांवर क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर अंतर्गत येणारी १० पोलिस ठाणी व २१ आऊटपोस्टच्या ठिकाणी बुधवारपासून या उपक्रमाची अंमलबजावणी झाली.
लोहमार्ग पोलिस महासंचालक डाॅ. प्रज्ञा सरवदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून लोहमार्ग घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल सुरू केले. रेल्वेत गुन्ह्यांना बळी पडणाऱ्या प्रवाशांच्या मनात लोहमार्ग पोलिसांविषयी विश्वास निर्माण होण्यासाठी त्यांनी ‘मिशन ट्रस्टेड पोलिसिंग’ हा उपक्रम हाती घेतला आहे. १० जानेवारी रोजी अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर विभागात याची सुरूवात केली. बुधवारी त्यांनी त्याचा डेमो घेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी उपअधीक्षक मनोज पगारे, निरीक्षक गणेश दळवी, सहायक निरीक्षक अमोल देशमुख, प्रशांत गंभीरराव व प्रेमलता जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
काय आहेत सूचना ?
- गुन्हा घडल्यापासून २ तासांत गुन्हा दाखल करा.
- महिला प्रवाशांची छेड, बालके बेपत्ता प्रकरणात एका तासात कारवाई हवी.
- संशयास्पद व्यक्तींच्या तावडीतून बालकांची सुटका करा.
- बेवारस, संशयास्पद वस्तूंचा शोध घेऊन तत्काळ कार्यवाही करावी.
क्यूआर कोड कसा काम करणार?
- छत्रपती संभाजीनगर अंतर्गत येणारी १० पोलिस ठाणी, २१ आऊटपोस्टच्या ठिकाणी हे क्यूआर कोड लावण्यात आले आहेत.
- प्रक्रियेनंतर प्रवासी, तक्रारदार त्याला स्कॅन करून तेथील फिडबॅक फाॅर्ममध्ये अभिप्राय नोंदवतील. त्यात मिळालेल्या अनुभवाविषयी तक्रारदेखील करता येईल.
- याची नोंद घेत थेट पोलिस महासंचालक कार्यालयातून पाठपुरावा होईल.