‘क्लोन चेक’द्वारे फसवणूकीची व्याप्ती देशभर; औरंगाबादमधील आरोपींना नेले उत्तर प्रदेशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 07:15 PM2018-09-18T19:15:06+5:302018-09-18T19:16:08+5:30
आरोपींनी उत्तर प्रदेशातील सार्वजनिक बांधकाम विभागाची क्लोन चेकद्धारे चार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
औरंगाबाद : क्लोन चेकद्वारे देशभरातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या टोळीतील हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीतील दोन आरोपींना रविवारी उत्तर प्रदेशातील सहारनपूर पोलिसांनीही अटक करून नेले. या आरोपींनी तेथील सार्वजनिक बांधकाम विभागाची क्लोन चेकद्धारे चार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
रशीद खान (रा. नालासोपारा) आणि राकेश ऊर्फ मनीष मौर्या (रा. उत्तर प्रदेश), अशी आरोपींची नावे आहेत. एका मोठ्या कंपनीचा क्लोन चेक तयार करून तो औरंगाबादेतील ठाणे जनता सहकारी बँकेतून वटवून ३ लाख ९५ हजार रुपये काढून फसवणकीप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात जून महिन्यात गुन्हा नोंद झाला होता. तपास करून गुन्हे शाखेने मुंबईसह विविध ठिकाणांहून सहा जणांना अटक केली होती. त्यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर, गुजरातमधील मणीनगर, महाराष्ट्रातील वर्धा, पुणे येथेही क्लोन चेकद्वारे कोट्यवधींची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी त्यांच्या टोळीतील एका व्यक्तीच्या नावे उघडण्यात आलेल्या खात्यात रक्कम जमा करीत. त्यानंतर ती रक्कम बँकेतून आणि विविध ठिकाणच्या एटीएममधून काढून घेत. यापूर्वी वर्धा आणि पुणे पोलिसांनीही आरोपींना अटक करून चौकशी केली होती. आरोपींविरुध्द सहारनपूर तेथे गुन्हा नोंद झाला होता. क्लोन चेकद्वारे फसवणूक करणारी टोळी औरंगाबाद पोलिसांनी अटक केल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहारनपूर गुन्हे शाखेचे निरीक्षक अभिजित भट्टाचार्य यांचे पथक औरंगाबादेत दाखल झाले. त्यांनी न्यायालयाकडून रशीद खान आणि राकेशची प्रवास कोठडी मिळविली.
मुख्य आरोपी सापडेना
या टोळीला क्लोन चेक देणारा मुख्य आरोपी श्रीवास्तव हा अद्यापही गुन्हे शाखेला मिळाला नाही. त्याचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेतर्फे सांगण्यात आले.