घोटाळा अन् घोळ, कोरोना म्हणजे घोटाळेबाजांसाठी जणू इष्टापत्तीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 06:27 PM2021-12-18T18:27:55+5:302021-12-18T18:29:29+5:30
२० महिन्यांत अनेक गैरप्रकार, कधी यंत्रसामुग्री, कधी रेमडेसिविर, तर लसीचा काळा बाजार, घोटाळा अन् घोळ
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जगभरासाठी कोरोना महामारी ठरत आहे. मात्र, या महामारीतही आरोग्य यंत्रणेतील काहींनी स्वत:चे खिसे भरण्याचा उद्योग केला. गेल्या २० महिन्यांत कधी रेमडेसिविरचा घोटाळा समोर आला, तर कधी लसीचा काळा बाजार समोर आला. आता पुन्हा एकदा पैसे आकारून लस न घेताच प्रमाणपत्र देणारी टोळी समोर आली.
अगदी ४ महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये वाळूज महानगरातील साजापूर येथे लसीचा काळा बाजार केल्याचा प्रकार समोर आला होता. धक्कादायक म्हणजे यामध्येही जि.प.च्या आरोग्य विभागाचेच कर्मचारी सापडले होते. याप्रकरणी जि.प.कडून चौकशी समिती नेमण्यात आली आणि नंतर लसीचा काळा बाजार केल्याप्रकरणी अटकेतील दोन आरोपी आरोग्यसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक लस घेण्यासाठी रांगा लावत होते. मात्र, लस मिळत नसल्याने काळा बाजार करणाऱ्यांकडून लस विकत घेण्याची वेळ ओढवत होती. आता समोर आलेल्या घोटाळ्यात लस न घेताच प्रमाणपत्र देण्याचा उद्योग सुरू होता.
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी एक टोळी १६ एप्रिल रोजी पुंडलिकनगर पोलिसांनी गजाआड केली होती. घाटीतील काही रेमडेसिविर इंजेक्शन चोरीला गेल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १४ एप्रिल रोजी प्रकाशित केले होते. त्यानंतर ही टोळी गजाआड झाली होती. यातील एक आरोपी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी होता.
काही चर्चेतील प्रकरणे :
सरकारी व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना
तज्ज्ञ डाॅक्टरांचा अभाव असल्याचे कारण पुढे करून २६ सरकारी व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना देण्यात आले. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने १० ऑगस्ट २०२० रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून उघडकीस आणला.
पीपीई किटचा प्रयोग
हापकिनकडून पीपीई किटला अधिकृत मंजुरी मिळण्याआधीच त्या किटला औरंगाबादेतील घाटी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर प्रयोग सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हे सर्व पीपीई किट एका कंपनीने सॅम्पल किट म्हणून दिले. हा सगळा प्रकार ‘लोकमत’ने ९ एप्रिल २०२० रोजी समोर आणला.
भोजनाला खर्चाला वाढीव दराची फोडणी
औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात आहाराचा दर प्रतिव्यक्ती ११० रुपये असताना मनपात २१० रुपये, तर ग्रामीण भागांतील उपचार केंद्रात २१३ रुपये दर आकारण्यात येत असल्याचे समोर आले. हा प्रकारही ९ जुलै २०२० रोजी समोर आला.