‘सर्वोपचार’मध्ये औषधांचा तुटवडा
By Admin | Published: May 4, 2016 12:10 AM2016-05-04T00:10:33+5:302016-05-04T00:16:32+5:30
सितम सोनवणे ल्ल लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा झाला आहे़ औषधांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे देयके थकली आहेत़
रुग्णांची गैरसोय : पुरवठाधारक कंपन्यांचे २ कोटी ४४ लाख १४ हजारांची देयके थकली
सितम सोनवणे ल्ल लातूर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा झाला आहे़ औषधांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे देयके थकली आहेत़ त्यामुळे पुरवठा बंद झाला असून, रुग्णांची गैरसोय होत आहे़ जवळपास २ कोटी ४४ लाख १६ हजार रुपयांची देयके थकली आहेत़ अत्यावश्यक सेवा म्हणून उपलब्ध करून दिलेल्या औषधीचीही देयके थकली आहेत़ त्यामुळे सर्वोपचार रुग्णालय जुजबी औषधोपचारावर रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत़
लातूर जिल्ह्यात सध्यस्थितीत दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे़ तसेच तीव्र प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ अशा परिस्थितीत आजारी पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी आधार केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाणीटंचाई सोबतच औषधी टंचाईही निर्माण झाली आहे़ जिल्ह्यातील तसेच आंध्र व कर्नाटक सिमा भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी शासकीय रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल होतात़ त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागा अंतर्गत प्रतीदिन ८०० ते ९०० तपासणी केली जाते़ त्यातील किमान ५० ते १०० रुग्णांना गरजेनुसार उपचारासाठी दाखल करून घेतले जाते व त्यांच्यावर उपचार केले जातात़ पण मागील काही दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयात अपुरा औषध पुरवठा होत आहे़ अती गंभीर रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग व सर्व वॉर्डसाठी महत्त्वाची असणारी सेंट्र ओटू सिस्टिम मागील २० दिवसांपासून बंद आहे़
त्यामुळे रुग्णांना लागणाऱ्या १३ ते १४ इंजेक्शन व औषध गोळ्यांपैकी केवळ ६ ते ७ प्रकारचे औषधोपचार मिळत आहेत़ अन्य औषध गोळ्या गरजेनुसार रुग्णांना बाहेरून विकत आणून उपचार घ्यावे लागत आहेत़ अशा टंचाईग्रस्त परिस्थितीत या सर्वसामान्य नागरिकांची मात्र ससेहोलपट होत आहे़ सेंट्रल ओटू सिस्टिम मागील २० दिवसांपासून बंद आहे़ त्यामुळे प्रशासनाने जम्बो सिलेंडरचा वापर करून रुग्णांची तात्पुरती सोय केली आहे़ २० दिवसांत सुमारे ४०० सिलेंडर लागले असून, १ सिलेंडर ३१५ रुपयांना उपलब्ध होते़ सिलेंडरच्या माध्यमातून रुग्णांना आॅक्सिजन पुरविताना पुर्ण यंत्रणा कर्मचारी यांना सतर्क रहावे लागते़ सेंट्रल ओटू सिस्टिम मुळे अतिदक्षता विभाग तसेच वार्डामध्ये गंभीर झालेल्या रुग्णांना सहजपणे उपचार देता येतात़
जम्बो सिलेंडर वापरताना तात्काळ योग्य पद्धतीने वापर न झाल्यास रुग्णाला आपले प्राणही गमवावे लागतात़ यंत्रणा असूनही केवळ २ लाख १९ हजार रुपयांचे देयके थकल्यामुळे कंपनीने आॅक्सिजन पुरवठा बंद केले आहे़ तर औषध गोळ्यांचे २ कोटी ४४ लाख १६ हजार रुपयांची देयके थकल्यामुळे मागणी करूनही कंपन्यांकडून औषध पुरवठा होत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे़
रुग्णालयात केवळ ६ प्रकारची औषधी उपलब्ध़़़
सर्वोपचार रुग्णालयात १३ ते १४ प्रकारची औषधी व इंजेक्शन रुग्णांना आजारानुसार मिळतात़ परंतू सध्या रुग्णालयात केवळ ६ ते ७ प्रकारच्या औषधांचा पुरवठा आहे़ अन्य औषधांची गरज लागली तरी ते रुग्णालयाकडून मिळत नाहीत़ खाजगी औषधी दुकानातून रुग्णांना आणावी लागत आहेत़ यामुळे रुग्ण व नातेवाईकांची गैरसोय होत आहे़ केवळ औषधी कंपन्यांची देयके थकल्यामुळे ही परिस्थिती रुग्णालय प्रशासनावर ओढावली आहे़ दरम्यान रुग्णालयाकडूनही निधी मिळाला नसल्याचे कारण सांगितले जात आहे़
निधी मिळाला नाही़़़
सर्वोपचार रुग्णालयाचे मागील वर्षाचे बजेट मंजूर झाले होते़ पण शासनाकडून ते दिले गेले नव्हते़ यावर्षीच्या बजेट मंजूर झाले आहे़ पण महाविद्यालयाकडे ते हस्तांतरीत केले नाही़ बजेट आल्यानंतर देयके तत्काळ काढले जातील असे शासकीय सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ़अशोक शिंदे यांनी सांगितले़