पशु चिकित्सालयांत औषधींचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:28 PM2017-11-17T23:28:44+5:302017-11-17T23:28:59+5:30
तालुक्यातील पशूवैद्यकीय दवाखान्यांमध्ये महत्त्वाच्या लसीसह इतर औषधींचा तुटवडा जाणवत असल्याचे शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून पहावयास मिळाले. पशूपालकांना एका चिठ्ठीवर बाहेरुन औषधी घेऊन येण्याच्या सूचना दिल्या जात होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील पशूवैद्यकीय दवाखान्यांमध्ये महत्त्वाच्या लसीसह इतर औषधींचा तुटवडा जाणवत असल्याचे शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून पहावयास मिळाले. पशूपालकांना एका चिठ्ठीवर बाहेरुन औषधी घेऊन येण्याच्या सूचना दिल्या जात होत्या.
परभणी तालुक्यातील पिंगळी येथील पशूवैद्यकीय दवाखान्यास सकाळी ९.३० वाजता भेट दिली असता दवाखाना परिसरात जनावरे उपचारासाठी दाखल केलेली पहावयास मिळाली. दवाखान्यामध्ये पशूधन विकास अधिकारी जे.के. सोळंके यांच्यासह एक कर्मचारी दवाखान्यात उपस्थित होता. यावेळी पाहणी केली असता पशूधन विकास अधिकारी आपल्या कक्षामध्ये पशूपालकांना एका चिठ्ठीवर औषधी लिहून देत होते. तर एक कर्मचारी गायीवर उपचार करीत होता. याबाबत पशूधन विकास अधिकारी सोळंके यांना बाहेरुन औषधी विकतची आणण्याचे पशूपालकांना सांगत आहात, दवाखान्यामध्ये औषधी उपलब्ध नाही का? अशी विचारणा केली असता दवाखान्यामध्ये व्हॅक्सीन लस उपलब्ध नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून अद्यापही ही लस उपलब्ध करुन देण्यात आली नाही, असे सांगितले. इतर औषधी उपलब्ध आहे. परंतु, जनावरांच्या आजाराची पातळी लक्षात घेता चांगल्या दर्जाची औषधी बाहेरुन विकत आणावी लागत आहेत. जनावरांचा आजार बरा करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे सोळंके यांनी सांगितले. शासनाच्या वतीने दिली जाणारी औषधी चांगल्या प्रतीची नाहीत का? अशी विचारणा केली असता त्यांनी मौन पाळले. याबाबत पशूपालकांशी चर्चा केली असता वैद्यकीय अधिकारी नियमितपणे येतात, असे सांगितले. परंतु, दवाखाना परिसरात एका खाजगी डॉक्टरची दुचाकीही पहावयास मिळाली.
सोनपेठमध्ये अप-डाऊनवर कारभार
४सोनपेठ- सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील दवाखान्यास सकाळी ९ वाजता सदर प्रतिनिधीने भेट दिली असता दोन कर्मचारी उपस्थित होते. येथील एक वैद्यकीय अधिकारी गंगाखेड तर दुसरा वैद्यकीय अधिकारी परभणी येथून उप-डाऊन करतो. त्यामुळे डॉक्टर १० वाजता येतात, असे सांगण्यात आले. त्यानंतर डिघोळ येथे सकाळी १० वाजता भेट दिली असता पशूवैद्यकीय दवाखाना बंद होता. ग्रामस्थांशी चर्चा केली असता येथील डॉक्टर सोनपेठहून अप-डाऊन करीत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ११ वाजता डॉक्टरांशी मोबाईलवरुन संपर्क साधला असता नंतर बोलतो, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर सोनपेठ येथील पशूवैद्यकीय दवाखान्यास भेट दिली असता वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ार दवाखान्यांची जबाबदारी एकावरच
सेलू: तालुक्यातील चार दवाखान्यांचा पदभार एकाच डॉक्टरावर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे पशूधनाचे आरोग्य राखण्यासाठी पशूपालकांना खाजगी डॉक्टरांकडे जावे लागते. शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये हे वास्तव पहावयास मिळाले. सेलू येथील पशू चिकित्सालयास शुक्रवारी सकाळी १० वाजता भेट दिली असता पशूधन विकास अधिकारी डॉ.कपील भालेराव उपस्थित होते. पशूपालकांनी उपचारासाठी जनावरे आणली होती. उपचार सुरु असले तरी डॉ. कपील भालेराव यांच्याकडे सेलू, चिकलठाणा, बोरकिनी, मोरेगाव येथील दवाखान्याचाही पदभार सोपविण्यात आला आहे. तालुक्यातील जवळपास २० हजार २३८ जनावरांच्या आरोग्याची जबाबदारी एकाच वैद्यकीय अधिकाºयावर आली आहे. दररोज २० ते ४० जनावरे सेलू येथे उपचारासाठी येतात. एक डॉक्टर व एक परिचर या दोघांवर ही जबाबदारी आली आहे. तर चिकलठाणा बोरकिनी येथील पशूधन पर्यवेक्षकपद रिक्त असल्याने खाजगी डॉक्टरांशिवाय पर्याय नाही. दुपारी १ वाजेपर्यंत सेलू येथील दवाखान्यामध्ये जनावरांची गर्दी होती.
परभणीत अधिकारी अनुपस्थित
४परभणी येथील पशू चिकित्सालयास दुपारी १२.४५ वाजता ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने भेट दिली. यावेळी पशूवैद्यकीत अधिकारी जी.एम. लाठकर यांची खुर्ची रिकामीच होती. त्यांच्या नातेवाईकाची तब्येत बरोबर नसल्याने ते आले नसतील, असे येथील कर्मचाºयांनी सांगितले. येथील उपस्थित पशूधन पर्यवेक्षक माने यांच्याशी चर्चा केली. दवाखान्यामध्ये आलेल्या जनावरांवर माने उपचार करीत होते. त्यांच्या समवेत एक कर्मचारीही त्यांना मदत करत होता. दवाखान्यामध्ये औषधींचा तुटवडा आहे का, अशी विचारणा केली असता औषधी उपलब्ध आहे, परंतु, किती साठा आहे, याची माहिती मात्र लाठकर साहेबांकडे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्याच्या ठिकाणी दवाखाना असल्याने पशूपालकांची सकाळपासूनच गर्दी होते. जिल्ह्याचा दवाखाना असूनही या परिसरात जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याचे यावेळी पाहण्यात आले.
ंअसोला येथे वर्षाला औषधी
४परभणी तालुक्यातील असोला येथील पशूवैद्यकीय दवाखान्यात सकाळी ११.३५ वाजता भेट दिली असता येथे एका बैलावर कर्मचारी व एक शिकाऊ कर्मचारी उपचार करीत असल्याचे पहावयास मिळाले. असोला येथील पशूवैद्यकीय दवाखान्यात एका पशूधन विकास अधिकाºयासह एका कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी दोन्ही कर्मचारी दवाखान्यामध्ये उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी पवार यांच्याशी चर्चा केली असता दवाखान्यामध्ये वर्षाला एकदा औषधीचा पुरवठा केला जातो, असे त्यांनी सांगितले. वर्षभरातून औषधी आली नसल्याने तुटवडा जाणवत असल्याचे समर्थन केले. असे असले तरी दवाखान्याचा परिसर हा काटेरी झुडपांनी वेढलेला आहे. इमारतीलाही जागोजागी तडे गेले आहेत.