अवकाळी पावसाने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:27 AM2018-03-20T00:27:36+5:302018-03-20T11:03:22+5:30

जिल्ह्यात सोमवारी (दि.१९) सायंकाळी सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला.

 Scarcity of rain | अवकाळी पावसाने दाणादाण

अवकाळी पावसाने दाणादाण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी (दि.१९) सायंकाळी सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात झालेल्या या पावसामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली, तर सोयगावात तुरळक ठिकाणी बारीक गारा पडल्या. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरात अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले.

चिंचोली लिंबाजीसह परिसराला सोमवारी रात्री वादळी वा-यासह अवकाळी पावसाने झोडपले. अर्धा तास पाऊस झाल्याने मका, गहू, हरभरा, कांदा, कांदा बियाणे यासह भाजीपाला व फळबागांना फटका बसला. चिंचोली लिंबाजीसह नेवपूर, वाकी, तळनेर, घाटशेंद्रा, टाकळी अंतूर, लोहगाव, बरकतपूर, रायगाव, वाकद, गणेशपूर, जामडी, दहीगाव, शेलगाव, दिगाव, खेडी परिसरात रात्री ८ च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसाने शेतकºयांची चांगलीच धांदल उडाली.

सध्या परिसरात शेतकºयांची गहू, हरभरा, मका काढणी सुरू आहे. अचानक आलेल्या या आस्मानी संकटामुळे अनेकांच्या जमा करून ठेवलेल्या राशी पावसाने भिजल्या. यामुळे शेतकºयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.अंभईसह पिंपळदरी, लिहाखेडी परिसराला अवकाळी पावसाने झोडपले. मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटात सुमारे अर्धा तास जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.सोमवारी सायंकाळी ७.१० ला सुरू झालेला पाऊस ७.४० पर्यंत सुरू होता. अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे गंजी घालून ठेवलेला मका झाकण्यासाठी व उघड्यावर बांधलेली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी शेतकºयांची एकच तारांबळ उडाली

सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव, उपळी, अंधारी, अजिंठा, गोळेगाव, आमठाणा, आमखेडा, घटांब्री, पानवडोद येथे पावसाने सायंकाळी हजेरी लावली. सोयगाव तालुक्यासह बनोटीत मेघगर्जनेसह पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील अनेक गावांची वीज गुल झाली होती. यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला, तर फुलंब्री तालुक्यात रात्री ९.२५ वाजता पावसाला सुरुवात झाली होती.

सोयगावात तुरळक गारांचा पाऊस
सोयगाव/फर्दापूर : सोयगाव तालुक्यात सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. सोयगाव शहरासह तालुक्यात काही ठिकाणी बारीक गारांचा पाऊस झाल्याचे नागरिकांनी सांगितले, तर फर्दापूर येथे सायंकाळी ६ वाजता वादळी वाºयासह विजांच्या कडकडाटात जवळपास अर्धा तास रिमझिम पाऊस झाला. यामुळे शेतकºयांसह नागरिकांची पिके वाचविण्यासाठी धावपळ उडाली. दरम्यान, फर्दापुरात वीज गुल झाल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

Web Title:  Scarcity of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.