सोयाबीन बियाणे टंचाईची भिती

By Admin | Published: May 20, 2014 12:04 AM2014-05-20T00:04:11+5:302014-05-20T00:07:15+5:30

पालम : तालुक्यात शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली आहे़ दरवर्षी सोयाबीनच्या पेर्‍यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे़

Scarcity of soybean seeds | सोयाबीन बियाणे टंचाईची भिती

सोयाबीन बियाणे टंचाईची भिती

googlenewsNext

पालम : तालुक्यात शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली आहे़ दरवर्षी सोयाबीनच्या पेर्‍यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे़ यावर्षी मात्र सोयाबीनच्या बियाणांची टंचाई होण्याची भिती निर्माण झाली आहे़ यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला असून, घरच्या बियाणांचा वापर करण्याच्या विचारात आहेत़ शेतकर्‍यांचे नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते़ दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनची काढणी करण्यात येते़ यामुळे सोयाबीनची विक्री करून दिवाळीचा सण धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो़ सोयाबीनसाठी बियाणे, रासायनिक खते व औषधींवर कमी खर्च होत असतो़ खर्चाच्या मानाने सोयाबीनचे उत्पादन चांगले होत असल्याने शेतकरी वर्ग सोयाबीनच्या पेरणीकडे मागील चार वर्षात वळला आहे़ सोयाबीन पिकाची काढणी झाल्यानंतर रबी हंगामातील पिके शेतकर्‍यांना घेता येतात़ यामुळे एका वर्षात दोन पिके निघत असल्याने सोयाबीनचा पेरा वाढत आहे़ मागील वर्षी सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली होती़ सलग पडणार्‍या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन बरेचसे घटले होते़ यावर्षी शेतकरी सोयाबीनच्या पेरणीकडे जास्त वळले आहेत़ परंतु, बियाणे टंचाईने शेतकर्‍यांपुढे प्रश्न उभा केला आहे़ (प्रतिनिधी) घरच्या बियाणांचा वापर बाजारपेठेत यावर्षी सोयाबीनच्या बियाणांची उपलब्धता होणे कठीण आहे़ मागणीचा विचार करता २५ टक्क्याच्या आसपास बियाणे उपलब्ध होईल, असा अंदाज आहे़ यामुळे पेरणीच्या तोंडावर बियाणांची अडचण भासणार आहे़ ही बाब प्रशासनानेही ओळखली असून, शेतकर्‍यांनी घरच्या बियाणांचाच पेरणीसाठी वापर करावा, यासाठी जनजागृती केली जात आहे़ बाजारपेठेत बियाणे न मिळाल्यास शेतकर्‍यांना घरच्याच बियाणांचा आधार घ्यावा लागणार आहे़ चांगल्या बियाणांचा शोध शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणीसाठी शेत तयार केले आहेत़ पाऊस पडताच बियाणांची पेरणी केली जाईल़ बाजारपेठेत आलेले बियाणे मिळेल त्या भावाने विकत घेतले जात आहे़ बियाणांची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी घरच्या बियाणांकडे वळला आहे़ सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने महिनाभरापूर्वीच अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनची विक्री केली आहे़ ज्या शेतकर्‍यांकडे सध्या सोयाबीन शिल्लक आहे अशा शेतकर्‍यांकडे दर्जेदार बियाणांची विचारणा केली जात आहे़ सोयाबीनमध्ये भेसळ नसेल तर ज्यादा पैसे मोजून चांगल्या प्रतीचे बियाणे खरेदी करण्याकडे शेतकर्‍यांचा कल आहे़ बीज प्रक्रिया करावी शेतकर्‍यांनी घरच्या बियाणांचा वापर करताना बीज प्रक्रिया करावी़ बीज प्रक्रियेची माहिती तालुका कृषी कार्यालय यांच्याकडून देण्यात येत आहे़ अधिकारी व कर्मचारी गावोगाव जाऊन शेतकर्‍यांना प्रक्रियेची माहिती देऊन प्रात्यक्षिक करून घेत आहेत़ बियाणे पेरणीपूर्वी शेतकर्‍यांनी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुरेंद्र पवार यांनी केले आहे़

Web Title: Scarcity of soybean seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.