सफाई कामगारांनो, उद्योजक बना; ऑनलाइन आले ११ हजार ४०० अर्ज, पुढील निर्णयाची प्रतीक्षा
By साहेबराव हिवराळे | Published: July 29, 2023 06:30 PM2023-07-29T18:30:31+5:302023-07-29T18:30:58+5:30
साहेब, कधी होणार कर्ज प्रकरणाचा निपटारा?
छत्रपती संभाजीनगर : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने सफाई कामगारांना उद्योजक बनण्यासाठी ऑनलाइन कर्ज प्रकरणासाठी आवाहन करताच तब्बल ११ हजार ४०० फाइल ऑनलाइन येऊन धडकल्या आहेत. पण, पुढील प्रक्रियाच सुरू झालेली नाही.
साहेब, कधी निर्णय होईल कर्ज प्रकरणाचा, अशी विचारणा करणारे अर्जदार सातत्याने कार्यालयात हेलपाटे घालत आहेत. परंतु, वरिष्ठांकडून अद्याप निर्णय झालेला नाही.
कोणत्याही कार्यालयात स्वच्छता कामगार म्हणून कामास असलेल्यांना विविध रोजगार उभारण्यासाठी १ ते १५ लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्यात ११ हजार ४०० फाइल जमा झाल्या आहेत. परंतु, वरिष्ठांनी अद्याप यावर काहीही निर्णय न घेतल्याने अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा सवाल नवीन रोजगार उभारू पाहणाऱ्यांकडून उपस्थित होत आहे. सफाई कामगारांवर अवलंबून असलेल्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी व त्यांनी स्वत:चा उद्योग उभारावा व इतरांनाही रोजगार द्यावा, अशा प्रकारचे नियोजन आहे. परंतु, त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेतच कर्जाची मागणी करणाऱ्यांची दमछाक होत आहे.
‘गळ्यात मडके, पाठीला झाडू’ अनुसूचित जाती-जमातीचे वाल्मीक समाजाचे एनएसकेएफडीसीची कर्जप्रकरणे किमान १० वर्षांपासून प्रलंबित आहेत. नवीन फाइलचाही ढीग साचत आहे. जुनी प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, यासाठी २ ऑगस्ट रोजी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळासमोर ‘गळ्यात मडके, पाठीला झाडू’ घालून मूक निदर्शने करणार आहोत.
- राजेंद्र पोहाल, भारतीय बहुजन कामगार संघ
वरिष्ठांकडून अद्याप निर्णय नाही
सफाई कामगारांसाठी ऑनलाइनच्या फाईल ११,४०० आल्या असून, वरिष्ठांनी कर्ज प्रकरणावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. यामुळे सध्या काहीही सांगता येणार नाही.
- अहेमद शेख, जिल्हा व्यवस्थापक