देखाव्यातून मंडळांनी केले प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:47 PM2017-08-30T23:47:20+5:302017-08-30T23:47:20+5:30
णेशोत्सव काळात शहरातील विविध गणेश मंडळांनी सजीव देखावे सादर केले असून, प्रत्येक देखाव्यातून वेगवेगळे सामाजिक प्रश्न हताळण्यात आले आहेत़ विशेष म्हणजे भारत- चीनच्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही देखाव्यामधून नागरिकांना प्रबोधन केले जात आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गणेशोत्सव काळात शहरातील विविध गणेश मंडळांनी सजीव देखावे सादर केले असून, प्रत्येक देखाव्यातून वेगवेगळे सामाजिक प्रश्न हताळण्यात आले आहेत़ विशेष म्हणजे भारत- चीनच्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही देखाव्यामधून नागरिकांना प्रबोधन केले जात आहे़
परभणी शहरात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो़ अनेक गणेश मंडळांना दोन ते तीन दशकांची परंपरा लाभली आहे़ या सर्व गणेश मंडळांनी यावर्षीही श्रींची प्रतिष्ठापना केली असून, उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक प्रश्नांचे प्रबोधन होऊन सामाजिक स्वास्थ्य सुदृढ करण्याचा प्रयत्न मंडळांनी केला आहे़ दररोज सायंकाळी ७ ते १० या वेळेत शहरातील गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे़
गणेशोत्सव काळात देखाव्यांच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम केले जाते़ मागील काही वर्षांपासून खर्चिक आणि स्थिर देखावे तयार करण्यापेक्षा सजीव देखाव्यांवर मंडळांचा भर असल्याचे दिसत आहे़ आवाढव्य खर्च करून देखावा उभारणे जवळपास कालबाह्य झाले आहे़ त्यामुळे गणेशोत्सवाच्या या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना हात घालत प्रबोधनाचा संदेश देण्याचे काम मंडळांनी केले आहे़
दोन दिवसांपासून शहरातील सर्वच गणेश मंडळांनी हे देखावे नागरिकांसाठी खुले केले असून, सायंकाळी ७ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत देखावे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत़ विशेष म्हणजे गणेश विसर्जन मिरवणुकीतही स्वतंत्र देखावे केले जातात आणि बाप्पांना निरोप देतानाही एक चांगला संदेश घेऊन गणरायाचे विसर्जन केले जाते़