जायकवाडीतून शेतीसाठी पाण्याचे वेळापत्रक; रब्बीसाठी ३ तर उन्हाळी हंगामाकरिता ५ आवर्तने

By बापू सोळुंके | Published: December 3, 2022 01:44 PM2022-12-03T13:44:03+5:302022-12-03T13:45:26+5:30

जायकवाडीमुळे सुमारे १ लाख ८० हजार हेक्टरवर जमीन सिंचनाखाली

Schedule of water for agriculture from Jayakwadi; Three revisions for Rabbi and five revisions for summer season | जायकवाडीतून शेतीसाठी पाण्याचे वेळापत्रक; रब्बीसाठी ३ तर उन्हाळी हंगामाकरिता ५ आवर्तने

जायकवाडीतून शेतीसाठी पाण्याचे वेळापत्रक; रब्बीसाठी ३ तर उन्हाळी हंगामाकरिता ५ आवर्तने

googlenewsNext

- बापू सोळुंके
औरंगाबाद :
पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडल्याने जायकवाडी धरण १०० टक्के भरले आहे. यामुळे रब्बी हंगामासाठी तीन आणि उन्हाळी पिकासाठी पाच ते सहा आवर्तने देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. या बैठकीत पाणी सोडण्याचे वेळापत्रकही निश्चित केले असून, पहिले आवर्तन सुरूही झाले आहे.

जायकवाडी धरणाच्या उर्ध्वक्षेत्रात पावसाळ्यात जोरदार पाऊस पडला. यामुळे ऑक्टोबर महिन्यातच जायकवाडी धरण भरले होते. जायकवाडी धरणात सतत पाण्याची आवक सुरू होती, यामुळे अनेकवेळा पाण्याचा विसर्गही करावा लागला होता. जायकवाडी धरण काठोकाठ भरल्याने यंदा रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांसाठी हवे तेवढे पाणी सोडणे शक्य होणार आहे. पाणी वितरणासंबंधी नुकतीच जलसंपदा विभागाच्या गोदावरी पाटबंधारे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण(कडा)चे मुख्य अभियंता जयंत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत उपलब्ध जलसाठा, सिंचन, एमआयडीसी आणि पिण्याच्या पाण्याच्या मागणीचा विचार करून पाणीवाटपाचे नियोजन करण्यात आले.

जायकवाडी धरणातून रब्बीसाठी तीन तर उन्हाळी पिकांसाठी पाच किंवा सहा आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कडाचे अधीक्षक अभियंता सब्बीनवार यांनी दिली. ते म्हणाले, ग्रामपंचायत आचारसंहितेमुळे या बैठकीला पालकमंत्री आणि विभागातील लोकप्रतिनिधींना बोलावता आले नाही. मात्र, रब्बी हंगामासाठी तातडीने पाणी सोडणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणीवाटपाचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले. यानुसार रब्बी हंगामातील पिकासाठी तीन आवर्तने देण्याचा निर्णय झाला आहे. पहिले आवर्तन देण्यास सुरुवात झाली. उन्हाळी पिकासाठी पाच आवर्तने देण्यात येणार आहेत.

जायकवाडीमुळे सुमारे १ लाख ८० हजार हेक्टरवर जमीन सिंचनाखाली
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून १ लाख ४० हजार हेक्टर तर उजव्या कालव्याद्वारे ४० हजार हेक्टरवरील जमीन ओलिताखाली आली आहे. तसेच धरण परिसरातील शेतकरी मोटारपंप टाकून शेतीसाठी पाणी नेतात. यासोबत ४० ग्रामपंचायती तसेच औरंगाबाद, जालना शहरांसह एमआयडीसीतील उद्योगांना पाणीपुरवठा होतो.

आवर्तनाचे वेळापत्रक
रब्बी हंगाम (डावा कालवा)

आवर्तन क्रमांक १ - १८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर
आवर्तन २ - १८ डिसेंबर ते १६ जानेवारी
आवर्तन ३ - १८ जानेवारी ते २८ फेब्रुवारी

(उजवा कालवा)
आवर्तन १ - २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर
आवर्तन २ - २५ डिसेंबर ते १० जानेवारी २०२३
आवर्तन ३ - १५ जानेवारी ते ३१ जानेवारी
आवर्तन ४ - १० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२३

उन्हाळी हंगाम
डावा कालवा

आवर्तन १ - १ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३
आवर्तन २ - २६ मार्च ते १८ एप्रिल
आवर्तन ३ - १९ एप्रिल ते १२ मे
आवर्तन ४ - १३ मे ते ५ जून
आवर्तन ५ - ६ जून ते ३० जून

उजवा कालवा
आवर्तन क्रमांक १ - १ मार्च २०२३ ते २२ मार्च
आवर्तन २ - १ एप्रिल ते २४ एप्रिल
आवर्तन ३ - १ मे ते २० मे
आवर्तन ४ - २५ मे ते १० जून
आवर्तन ५ - १५ जून ते ३० जून

Web Title: Schedule of water for agriculture from Jayakwadi; Three revisions for Rabbi and five revisions for summer season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.